मुंबई : शिवसेनेची स्थापना झाली त्या दादरचा समावेश असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात चुरशीची लढत होत आहे. शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवनचा समावेश असलेला हा परिसर ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे. धारावीच्या पुनर्विकासावरून आधीच राळ उठल्याने त्याचे पडसाद मतदानात उमटण्याची चिन्हे आहेत. धारावी, अणुशक्तीनगर, चेंबूर, वडाळा सर्वाधिक कष्टकरी वर्ग निकाल ठरविणार आहे.

शिवसेना भवन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई या दोन शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. मुंबई महापालिकेची चार वर्ष तिजोरी सांभाळणाऱ्या शेवाळे यांना दहा वर्षापूर्वी शिवसेनेने संसदेत जाण्याची संधी दिली.. शिवसेना फुटीनंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटाची कास धरली. या दोन शिवसैनिकांचे भवितव्य माहिम, वडाळा, सायन कोळीवाडा, चेंबूर, आणि अणूशक्तीनगर या सहा विधानसभा मतदार संघाच्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. जवळपास पंधरा लाख मतदार संख्या (१४ लाख ५६ हजार ३३९) असलेल्या या मतदार संघात धारावी, दादर, वडाळा ह्या भागातील कष्टकरी, मध्यमवर्गीय मतदार उमेदवाराचे भवितव्य ठरवत असल्याचे यापूर्वीच्या निकालावरुन दिसून येते. अणूशक्तीनगर (नबाब मलिक, राष्ट्रवादी) चेंबूर ( प्रकाश फातर्फेकर, ठाकरे गट) सायन कोळीवाडा ( कॅप्टन तमिळ सेल्वन, भाजप) वडाळा ( कालिदास कोळंबकर, भाजप) धारावी (वर्षा गायकवाड, काँग्रेस) आणि माहिम (सदा सरवणकर, शिंदे गट) असे भाजपचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे गट, व ठाकरे गटाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. लोकसभा निवडणूक ही विधानसभेची रंगती तालीम असल्याने हे आमदार आपल्या मतदार संघात लोकसभा उमेदवाराला जास्तीत जास्त मतधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

हेही वाचा : अतिशयोक्ती करणाऱ्या पंतप्रधानाकडे सांगण्याजोगे आहेच काय?-खरगे

धारावीचा पुर्नविकास हा या निव़डणूकीतील कळीचा मुद्दा ठरणार असल्याने या मतदार संघातील एकगट्ठा मते उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहे. धारावी पुनर्विकासावरून स्थानिकांमध्ये संभ्रम आहे. याच परिसरात पुनर्वसन होणार की बाहेर पाठविले जाणार याबाबत नागरिकांमध्ये गोंधळ आहे. ठाकरे गटाने धारावीवरून आक्रमक भूमिका घेतल्याने पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो. राहुल शेवाळे यांनीही धारावीकरांना आश्वस्त केले आहे. मनसेचा महायुतीला पाठिंबा मिळाल्याने शेवाळे यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. दादर-माहिममध्ये मनसेची चांगली ताकद आहे. पण मनसेची काही मते शिवसेनेच्या देसाई यांच्याकडे हस्तांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : कुरुक्षेत्रावर भाजपा आणि शेतकरी आमनेसामने; नवीन जिंदाल का सापडले अडचणीत?

म्हाडाच्या वसाहती आणि धारावी पुर्नविकास करण्याचे आश्वासन दोन्ही उमेदवार देत आहेत. याशिवाय प्रदुषण, वाहनतळ, पिण्याचे पाणी, क्षेपणभूमी हे प्रचारातील मुद्दे ठरत आहेत. यापेक्षा गद्दार विरुध्द निष्टावंत हा प्रचारातील महत्वाचा मुद्दा ठरत आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना राज्यात असलेली सहानभुती देसाई यांच्या पथ्यावर पडणारी आहे.त्यामुळे ते ठाकरे यांनी करोना काळात केलेली कामे आणि त्यांचा शिंदे-शेवाळे यांनी केलेला विश्वासघात प्रचारात ठसठसीतपणे मांडत आहेत. याउलट शेवाळे ही सहानभूतू फेटाळून लावत आहेत. लोकांना पोटापाण्याची चिंता आहे. करोना काळात काम केलेल्या माणसाच्या पाठीशी येथील मतदार राहतील अशी त्यांना खात्री आहे. वंचित आघाडीच्या उमेदवाराने मागील निवडणूकीत ६३ हजारापेक्षा जास्त मते मिळवली होती. वंचितने अब्दुल हसन खान यांना उमेदवारी दिली आहे. धारावी, चेंबूर या भागातून त्यांना किती प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखे आहे. धारावी पुर्नविकासावरुन अदानी समुहाला ठाकरे गटाने लक्ष केले आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या या मतदार संघात त्यांनी देसाई यांना जास्त मतधिक्य देण्याचे आश्वासन दिले आहे. उत्तर मुंबई मतदार संघात त्या काँग्रेस कडून उमेदवारी मिळाली आहे. त्यांना ठाकरे गट त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने मदत करीत असल्याने ते धारावीत त्याची परतफेड करीत आहेत. शेवाळे यांचा विजय हा शिंदे गटासाठी महत्वाचा असल्याने त्यांनी त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

हेही वाचा : मुस्लिम, हुकूमशहा अन् दिवाळखोरी शब्द वापरण्यावर बंदी; सीताराम येचुरी अन् देवराजन यांच्या भाषणातून शब्द वगळले

नवाब मलिक यांची मदत कोणाला ?

अणुशक्तीनगर मतदारसंघाचे आमदार नवाब मलिक यांची मदत कोणाला होते हे महत्त्वाचे आहे. मलिक हे अजित पवार गटाबरोबर असले तरी त्यांच्या महायुतीतील प्रवेशावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे विरोध दर्शविला होता. मलिक हे प्रचारात सक्रिय नाहीत. या मतदारसंघातील मुस्लीम आणि दलित मते निर्णायक ठरणार आहे.