थकबाकीमुक्ती योजनेचा १.१५ लाख शेतकऱ्यांना लाभ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ५१८ शेतकऱ्यांनी वीज देयकाच्या थकबाकीची १९१ कोटी २४ लाखांची रक्कम भरली आहे. कृषिपंपाच्या देयकातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी या धोरणाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे देयक कोरे करावेत तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

योजनेत वीज देयकाच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत आणि जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. हा निधी त्या-त्या ग्रामपंचायत, जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. या निधीतून नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र, क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण आणि उपकेंद्रातील विविध यंत्रणेचे पायाभूत सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ९९५ कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे एकूण ३०९६ कोटी २८ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणच्या निर्लेखन सूट द्वारे आता २३४२ कोटी ५९ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास आणखी ११७१ कोटी ३० लाख रुपयांच्या उर्वरित सुधारित थकबाकीची रक्कम माफ होणार आहे.

३१३ कोटी ५२ लाख रुपयांची माफी

पुणे जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ५१८ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी थकबाकी आणि चालू वीज देयकांपोटी १९१ कोटी २४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार, व्याजातील सूट अशी एकूण ३१३ कोटी ५२ लाख रुपयांची माफी मिळाली आहे. यामध्ये ३० हजार ३३ शेतकरी संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीज देयकासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के म्हणजे एकूण ७९ कोटी १७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे त्यांना आणखी ५७ कोटी ८६ लाख रुपयांची सूट मिळाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 191 crore electricity arrears collected from farmers in the district akp