महापालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयातील लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. अपघातातील तीन जखमींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावरील उपचारांचा खर्च महापालिका करणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे महापालिकेत आंदोलन करण्यात आले.
कमला नेहरू रुग्णालयातील लिफ्ट कोसळण्याची ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडली. या अपघातात सिपिका तेलिसरी (वय १४), स्नेहा तेलिसरी (वय ३३), रितेश जालर (वय ३५), साफिया खान (वय २३) आणि लिफ्टवरील कर्मचारी विनोद चव्हाण (वय २३) हे जखमी झाले. त्यापैकी सिपिका, स्नेहा आणि रितेश यांना गुडघ्यांना मार बसला असून सर्वावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात असल्याचे सांगण्यात आले.
लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती होत्या त्यामुळे हा प्रकार घडला. या घटनेनंतर आता क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती लिफ्टमध्ये गेल्यास सावध करणारी यंत्रणा प्रत्येक लिफ्टमध्ये बसवली जाईल. त्यामुळे लिफ्टमध्ये जादा भार येणार नाही असे सांगण्यात आले. लिफ्ट कोसळण्याची घटना हा तांत्रिक व विद्युत यंत्रणेत निर्माण झालेला दोष असून अशा प्रकारचे दोष अचानक निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या प्रकाराला कोणाला जबाबदार धरता येणार नाही. मात्र, तांत्रिक दोषांची माहिती अगोदरच व्हावी यासाठी सर्वच लिफ्टची योग्य ती तपासणी करून घेतली जाईल, असे तांत्रिक विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी सांगितले.
शिवसैनिकांनी आयुक्तांची गाडी अडवली
महापालिका प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची तक्रार करत, तसेच या घटनेच्या चौकशीची मागणी करत शिवसैनिकांनी सायंकाळी महापालिका भवनात जोरदार आंदोलन केले. आयुक्तांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे अखेर उपशहर प्रमुख संजय मोरे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची गाडी अडवली. हे सर्व जण आयुक्तांच्या गाडीपुढे आडवे पडल्यानंतर आयुक्तांनी सर्वाना कार्यालयात बोलावून निवेदन स्वीकारले.
सहायक आरोग्यप्रमुखांची दिलगिरी
या प्रकाराची माहिती सहायक आरोग्यप्रमुख डॉ. एस. ए. तोरे यांना दिल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांबद्दल तसेच पक्षाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. त्याबद्दलही शिवसैनिकांनी आरोग्यप्रमुखांकडे तक्रार देऊन तेथे आंदोलन केल्यानंतर डॉ. तोरे यांनी दिलगिरी व्यक्त करणारे पत्र पक्षाला दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 injured in lift accident at kamla nehru hospital