अयोध्येत राम मंदिर उभारण्याला मुस्लिमांचा पाठिंबा दर्शविणाऱ्या लखनऊतील बॅनर्सवरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यातील धर्मगुरू डॉ. शबिब अहसन काझमी यांना या बॅनर्सवर विनापरवानगी आपले छायाचित्र छापल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. या बॅनर्सवर माझे छायाचित्र छापण्यात आले आहे, याची कल्पनाही मला नव्हती. हा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचेही आपल्याला माहित नसल्याचे डॉ. अहसन यांनी सांगितले. भाजप नेते कुँवर सैय्यद इक्बाल हैदर यांनी हे बॅनर्स लावले आहेत. ‘मुस्लिमों का यही अरमान, श्रीराम मंदिर का हो वहीं निर्माण’, ‘हो जन्मभूमि पर मन्दिर निर्माण, मुस्लिमों का यही अरमान’, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला होता. तसेच या बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचीही छायाचित्र छापण्यात आली होती. सोशल मीडियावर हे बॅनर्स प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. मात्र, काझमी यांनी राम मंदिराला आपला पाठिंबा असल्याचे परस्पर या बॅनर्सच्या माध्यमातून मांडले गेल्याचे सांगितले. मी राम मंदिराला अशाप्रकारचा कोणताही पाठिंबा दर्शविलेला नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय जो अंतिम निकाल देईल तो आपल्याला मान्य असेल, असे काझमी यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२१ मार्च रोजीच सर्वोच्च न्यायालयाने परस्पर सहमतीने या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. जर सर्व पक्षकार सहमत असतील तर मध्यस्थी करण्यास एखाद्या न्यायमुर्तीची नियुक्ती केली जाऊ शकेल, असे न्यायालयाने म्हटले होते. दरम्यान, राममंदिर प्रकरणाची दररोज सुनावणी घ्यावी ही भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या खटल्यात तुम्ही याचिकाकर्ते नाहीत. मग तुम्हाला या प्रकरणात एवढा रस का, असा सवाल करत दररोज या प्रकरणावर सुनावणी करण्यास आमच्याकडे वेळ नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सुब्रमण्यम स्वामींना फटकारले. दोन्ही पक्षकरांनी परस्पर सहमतीने निर्णय घ्यावा असे न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यानंतरही मागील सहा ते सात वर्षे या प्रकरणात काहीच हालचाल झाली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचा लवकर निकाल लागावा यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banner claiming muslim support for ram mandir uses photo of pune cleric without his permission