पुणे : बनावट दस्त तयार करून तो खरा असल्याचे भासवून सादर केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) तत्कालीन शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा करण मानकर आणि व्याही सुखेन सुरेशचंद्र शहा यांच्यावरही समर्थ पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मानकर यांच्याविरुद्ध दोन आठवड्यांपूर्वी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका गुन्ह्यात शंतनू सॅम्युअल कुकडे, सुखेन सुरेशचंद्र शहा, रौनक भरत जैन आणि इतर तर, दुसऱ्या गुन्ह्यात शंतनू सॅम्युअल कुकडे, करण दीपक मानकर आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कारातील आरोपी शंतनू कुकडेसोबतचे असलेले आर्थिक व्यवहार लपविल्याप्रकरणी आणि पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
परदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे याच्यावर गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत कुकडे याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्या बँक खात्यात शंभर कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. कुकडेच्या बँक खात्यातून मानकर पिता-पुत्रांच्या बँक खात्यात पावणेदोन कोटी रुपये वर्ग झाले होते. तर, करण याचा सासरा सुखेन शहा याच्या बँक खात्यात ६ कोटी ५२ लाख वर्ग झाले आहेत. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांची चौकशी सुरू होती.