नियोजित गृहप्रकल्पात चौदाव्या मजल्यावरुन पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.शाम नेमा रविदास (वय २२, रा. नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत रविदास याचा भाऊ देवेंद्रकुमार (वय २८) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बांधकाम ठेकेदार लज्जाराम गुजर, रामकेश गुजर, रवी गवंडे, अजिंक्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर भागातील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर एका नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. शाम रविदास नियोजित गृहप्रकल्पातील चौदाव्या मजल्यावरील बाल्कनीत फरशी बसविण्याचे काम करत होता.
हेही वाचा >>>पुणे: युवक काँग्रेसकडून राजभवनसमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन; पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
त्या वेळी चौदाव्या मजल्यावरुन रविदास तोल जाऊन पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. बांधकाम मजुराच्या सुरक्षेबाबत पुरेशा उपाययाेजना न केल्याने दुर्घटना घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदारासह चौघांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करत आहेत.