गुन्हेगाराला अटक करण्यासाठी पोलिसांना काय काय करावे लागते याचा अनुभव नुकताच सांगवीत आला. जबरी चोरी आणि वाहन तोडफोडीच्या घटनेतील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी सांगवी पोलीस चक्क वऱ्हाडीच्या वेशात लग्नमांडवात पोहोचले आणि नातेवाईकाच्या लग्नात आलेल्या आरोपीची मांडवातून थेट तुरुंगात रवानगी झाली. ऋतिक उर्फ फिरंग्या श्रीधर सोळंकी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वाहन तोडफोडीसह जबरी चोरीचा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असून हत्येचा प्रयत्नसारखा गंभीर गुन्हाही त्याच्याविरोधात दाखल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही महिन्यांपूर्वी जुन्या सांगवीत वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात ऋतिक उर्फ फिरंग्या हा आरोपी होता. तो पोलिसांना नेहमी चकवा देत फरार होत असे. सोमवारी आरोपी ऋतिक उर्फ फिरंग्या याच्या नातेवाईकाच्या मुलीचे लग्न होते. आरोपीच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाचे लग्न होते. त्यामुळे तो येणार असल्याची खात्री पोलिसांना होती. त्यानुसार साध्या गणवेशात पोलीस विवाहस्थळी वऱ्हाडी म्हणून दाखल झाले.

काही पोलीस मुख्य गेटवर थांबले होते. तर काही पोलीस कर्मचारी, अधिकारी कार्यालयात आरोपी ऋतिकला शोधत होते. फोटोवरून त्याची ओळख पटली. तेथील नातेवाकांनी पोलिसांना हटकले तेव्हा, आम्ही मुलीकडील वऱ्हाडी असल्याचे अधिकाऱ्याने उत्तर दिले. पोलिसांनी जेवणावर ताव मारला आणि माणुसकी म्हणून विवाह होईपर्यंत आरोपीला अटक केली नाही. आरोपीला या बद्दल काहीच कल्पना नव्हती. अचानक पोलिसांनी त्याला घेराव घालत लग्नमांडवातून अटक केली. त्याने झटापट केली तेव्हा कर्मचाऱ्याने त्याच्या कानशिलात लगावली. या सर्व प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. याप्रकरणी दोन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal arrives for relatives wedding caught by police at sangvi