पुणे : सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) पुणे आणि अहल्यादेवीनगर परिसरातील व्हीआयपीएस ग्रुप आणि ग्लोबल ॲफिलेट बिझनेस या खासगी वित्तीय संस्थेच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत १८ कोटी ५४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
व्हीआयपीएस ग्रुप आणि ग्लोबल ॲफिलेट वित्तीय संस्थेचा प्रमुख विनोद खुटे सध्या दुबईत वास्तव्यास आहे. आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने खुटे याने गुंतवणुकदारांकडून १२५ कोटी रुपये घेतले आहेत. ही रक्कम त्याने हवाला व्यवहारामार्फत वळविली असल्याचा संशय इडीने व्यक्त केला आहे. खुटे याने गुंतवणुकदारांना त्याच्या योजनांची माहिती देण्यासाठी ॲपचा वापर केला आहे. या ॲपचे नाव ग्लोबल ॲफिलेट बिझनेस असे आहे.
खुटे याने त्याच्या योजनेत अन्य गुंतवणुकदारांना सहभागी करून घेतल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. अशा पद्धतीने त्याने १२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आहे. खुटेविरुद्ध ‘फेमा’ (परकीय चलन व्यवस्थापन कायदा) कायद्यान्वये ईडीने गुन्हा दाखल केला आहे.