आळंदी ते पंढरपूर अशा पायी वारीमध्ये पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीची दारी’ या यात्रेचा शनिवारी (११ जुलै) शुभारंभ होत आहे. राज्य सरकारचा पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने निघणाऱ्या या यात्रेमध्ये दोनशे वारकरी सहभागी होत आहेत.
बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी दहा वाजता पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, महापौर दत्ता धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, विभागीय आयुक्त एस. चोक्किलगम या वेळी उपस्थित राहणार आहेत. या यात्रेमध्ये कीर्तन, प्रवचन, भारूड आणि पोवाडे या लोककलांच्या माध्यमातून प्लॅस्टिक हटाव वसुंधरा बचाव, झाडे लावा झाडे जगवा, ऊर्जाबचत, पाणीबचत, सेंद्रीय खतांचा वापर करून हरितक्रांती करा, ओला आणि सुका कचरा वेगळा करा असा संदेश देत जनजागृती केली जाणार आहे. शाहीर देवानंद माळी, चंदाबाई तिवाडी, ज्ञानेश्वरमहाराज वाबळे यामध्ये सहभागी होणार आहेत.
१२ तासांची कीर्तनमाला
‘पाहू द्या रे मज विठोबाचे रूप’ असे म्हणत आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पुणे मुक्कामी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विविध गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि संघटना पुढे आल्या आहेत. वारकरी भक्तांसाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळातर्फे सलग १२ तासांची कीर्तनमाला आयोजित करण्यात आली आहे.
लाल महाल येथे शनिवारी (११ जुलै) सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेमध्ये नारदीय कीर्तने सादर होणार आहे. विश्वास कुलकर्णी, मुक्ता मराठे, सुभाष देशपांडे, चिन्मय देशपांडे, न. चिं. अपामार्जने, रेशीम खेडेकर, प्रणव देव आणि बालकीर्तनकार होनराज मावळे असे आठ कीर्तनकार या मालेमध्ये सहभागी होणार आहेत. दिंडीप्रमुखांनी वारकऱ्यांसह या कीर्तनमालेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे यांनी केले आहे.
रिंगण’ वार्षिकांकाच्या
जनाबाई विशेषांकाचे प्रकाशन
संत परंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या ‘रिंगण’ या वार्षिक अंकाचा संत जनाबाई विशेषांक शनिवारी (११ जुलै) प्रकाशित होत आहे. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वरमाऊलींच्या पादुकांवर विशेषांक अर्पण करून प्रसिद्ध भारूड गायिका चंदाबाई तिवाडी यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता हे प्रकाशन होणार आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अभय टिळक, पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार, मानकरी श्रीमंत शितोळे सरकार, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त शिवाजीराव मोहिते या वेळी उपस्थित राहणार आहेत. याआधी ‘रिंगण’च्या वतीने संत नामदेव आणि संत चोखामेळा यांच्यावरील विशेषांक काढण्यात आले आहेत.