महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या बदलाची अंमलबजावणी राज्यसेवा परीक्षा २०२३पासून केली जाणार आहे. वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून २ हजार २५ गुण असे सुधारित योजनेचे स्वरुप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन अर्थात सी सॅट हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने एमपीएससीने माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सी सॅट विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय एमपीएससीने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. या समितीच्या कार्यकक्षेमध्ये राज्यसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सुधारित करण्याचाही समावेश होता. या संदर्भातील समितीच्या शिफारसीही एमपीएससीने स्वीकारल्या. 

सुधारित परीक्षा योजनेमध्ये वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिका असतील. त्यात एकूण नऊ पेपरचा समावेश असेल. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय प्रत्येकी २५ टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध,  सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३, सामान्य अध्ययन ४, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी दोनशे पन्नास गुणांसाठी असतील. मुलाखतीसाठी २७५गुण असतील. त्यामुळे एकूण गुण २ हजार २५असतील.  सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील. तसेच एकूण २४ विषयांतून उमेदवारांना वैकल्पिक विषय निवडता येईल. सुधारित परीक्षा योजना राज्यसेवा  परीक्षा २०२३ पासून लागू करण्यात येईल. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. 

 अधिकाधिक गुणवत्ताधारक उमेदवार मिळण्यास मदत होईल –

राज्यसेवा मुख्य परीक्षेची सध्याची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०१२ पासून लागू होता. त्यात कालानुरूप बदल करून परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाची रचना नव्याने करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक गुणवत्ताधारक उमेदवार मिळण्यास मदत होईल. तसेच सुधारित रचनेमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातील उमेदवारांचा टक्का वाढण्यासही मदत होऊ शकेल. असे मत एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे यांनी व्यक्त केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important decision of mpsc changes in state service examination scheme syllabus pune print news msr