उंच आकाशात डौलदार घिरटय़ा घेत जमिनीवरील भक्ष्याचा अचूक वेध घेणाऱ्या शिकारी पक्ष्यांचे विविध पैलू जाणून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. इला फाऊंडेशन आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड रीसर्च (आयसर) या संस्थांतर्फे आंतरराष्ट्रीय पक्षिशास्त्र परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शिकारी पक्ष्यांचा अभ्यास या परिषदेच्या केंद्रस्थानी असणार आहे.
 इला फाउंडेशनचे डॉ. सतीश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘शिकारी पक्षी संशोधन आणि संस्कृती’ असा या परिषदेचा विषय असून ६ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत पाषाण येथील ‘आयसर’ या संस्थेत या परिषदेची सत्रे होतील.
या परिषदेसाठी १७ देशांमधून १३० निबंध आले आहेत. पूर्वी देशात ससाण्यांचा वापर करून खेळल्या जाणाऱ्या शिकारीच्या खेळाचा इतिहास सांगणाऱ्या ‘फाल्कनरी इन द लँड ऑफ द ब्लॅकबक’ या निबंधाचे प्रकाशन या परिषदेत करण्यात येईल. तसेच नागालँड येथे ‘अमूर फाल्कन’ पक्ष्याच्या शिकारीविरोधात सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी प्रमुख वनसंरक्षक लोकेश्वर राव यांचे व्याख्यानही होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना व इतर नागरिकांना संपूर्ण परिषदेस उपस्थित राहता येणार नाही त्यांच्यासाठी ६ तारखेला संध्याकाळी तीन तासांच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात मंगोलियाचे प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. गाँबोबटार सुन्देव, पक्षीसंवर्धनात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ‘पेरीग्रीन फंड’ या संस्थेचे रिक व्ॉटसन, इस्त्रायली पक्षितज्ज्ञ डॉ. रीयूवन योसेफ, ‘द जर्नल ऑफ रॅप्टर रीसर्च’चे प्रमुख संपादक चेरिक डिकस्ट्रा आणि रशियन पक्षितज्ज्ञ मिरोस्लाव्ह बाबुश्किन आदिंची व्याख्याने होणार आहेत. केवळ या पाच व्याख्यानांना उपस्थित राहू इच्छिणारे ३१ जानेवारीपर्यंत शंभर रुपये शुल्क भरून आपली नावे नोंदवू शकणार आहेत.
संपूर्ण परिषद आणि गरूडमाची येथील क्षेत्रभेटीस उपस्थित राहण्यासाठी वेगळे शुल्क असून त्यासाठी नावनोंदणी करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी  www.arrcn.elafoundation.org या संकेतस्थळावर अथवा ९९७०१६१७९६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organisation of international bird science congress