पुणे : राज्यातील वीज ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले आणि त्यामुळे त्यांना किती काळ अंधारात घालवावा लागला, आदी वीजसेवेबाबतची माहिती जाहीर करण्यातील लपवाछपवीबाबत वीज नियामक आयोगाकडे तक्रार दाखल होताच महावितरणला जाग आली. पाच महिन्यांपासून जाहीर न केलेली माहिती एका दिवसात समोर आली. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत एका महिन्यात बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या ३० हजारांहून अधिक घटना घडल्याचे वास्तव आणि महावितरणचा कारभार त्यातून समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या नियमांनुसार महावितरणला प्रत्येक महिन्याला सेवेबाबतचे विश्वासार्हता निर्देशांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे बंधन घातले आहे. मात्र, अनेकदा ते जाहीर करण्याचे टाळले जात असल्याची बाब वेळेवेळी समोर आली आहे. महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर मार्च २०२२ नंतरचे निर्देशांक प्रसिद्धच केले नव्हते. ‘सजग नागरिक मंच’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुन्हा एकदा ही बाब वीज नियामक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली होती. गुरुवारी त्यांनी याबाबत आयोगाकडे तक्रार नोंदविली होती. ही तक्रार दाखल होताच महावितरणला जाग आली आणि संध्याकाळी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे विश्वासर्हता निर्देशांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले.

महावितरणनेच जाहीर केलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ मध्ये राज्यात बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या १४,२०५ घटना घडल्या होत्या. मार्चमध्ये परिस्थिती आणखी खालावली. या महिन्यात वीज खंडितच्या तब्बल ३० हजार ७४८ घटना घडल्या आहेत. मार्चमध्ये त्याचा फटका अडीच कोटी ग्राहकांना बसला होता. मात्र, जूनमधील वीज खंडित होण्याच्या प्रकारातून  तब्बल सहा कोटी ग्राहकांना एकूण ५१ हजार ५१ तास अंधाराचा सामना करावा लागला.

महावितरणकडून सातत्याने विश्वासार्हता निर्देशांकांची प्रसिद्धी करणे टाळले जाते. प्रत्येक महिन्याला महावितरणने स्वत:हून माहिती जाहीर करणे अपेक्षित असताना त्याबाबत तक्रार करावी लागणे दुर्दैवी आहे. तक्रार केल्यानंतर मात्र माहिती जाहीर केली जाते. म्हणजेच माहिती तयार असतानाही ती प्रसिद्ध केली जात नाही. कारण या माहितीतून महावितरणच्या कारभाराचे चित्र स्पष्ट होत असते. ढिसाळ कारभारात सुधारणा करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास वीज आयोगाने महावितरणला बाध्य करावे.– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 30 thousand incidents of power failure in maharashtra in one month mahavitaran pune print news zws