‘माझं स्वप्न, स्मार्ट पुणे’ या विषयावर सूचना पाठवण्याच्या आवाहनाला पुणेकरांनी सात दिवसात भरभरून प्रतिसाद दिला असून महापालिकेने जाहीर केलेल्या मुदतीत पाच हजारांहून अधिक पुणेकरांनी त्यांच्या सूचना/मते नोंदवली आहेत. स्मार्ट सिटी अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सोमवारी आयोजित कार्यशाळेत केले.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी महापालिकेतर्फे ‘माझं स्वप्न, स्मार्ट पुणे’ या विषयावर नागरिकांकडून सूचना व मते मागवण्यात आली असून उत्कृष्ट सूचना आणि मतांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. सूचना पाठवण्यासाठी सोमवारी रात्रीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. महापालिकेच्या आवाहनानुसार सोमवापर्यंत महापालिकेच्या संकेतस्थळाला चार लाख ४८ हजार ५८१ नागरिकांनी भेट दिली होती, तसेच पाच हजार २४१ नागरिकांनी सूचना/मते नोंदवली होती.
नगरसेवकांसाठी कार्यशाळा
स्मार्ट सिटी अभियानाची माहिती नगरसेवकांना देण्यासाठी महापालिकेतर्फे सोमवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले. उपमहापौर आबा बागूल, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृहनेता शंकर केमसे, भाजपचे गटनेता गणेश बीडकर, मनसेचे गटनेता राजेंद्र वागसकर, आयुक्त कुणाल कुमार यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. शहरातील अनेक विकासकामे या अभियानात होणार असून शहराचा दर्जा उंचावणार आहे. शहरात मोठय़ा प्रमाणावर विकासकामे करण्याची संधी या अभियानामुळे मिळाली आहे, असे महापौरांनी सांगितले.
स्मार्ट सिटी अभियानाचा उद्देश, धोरण, शहर निवड प्रक्रिया, नागरिकांचा सहभाग, सहकार्य आदी विविध विषयांबाबत आयुक्तांनी कार्यशाळेत माहिती दिली. केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालयातील तज्ज्ञ मेहताब यांनी या अभियानासाठी पुणे महापालिकेने केलेले प्रयत्न, नागरिकांच्या सहभागासाठी राबवलेले उपक्रम यांचे कौतुक केले. नगरसेवक, अधिकारी यांना अभियानाची सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच शंकांचे निरसन करण्यासाठी, विचारांचे आदान-प्रदान होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. या अभियानात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 5000 instructions for smart city scheme