स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मराठी समाजमन घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या ‘विविध ज्ञानविस्तार’ या नियतकालिकाचे शंभर अंकांचे आता संकेतस्थळावर वाचन करता येणार आहे. राज्य मराठी विकास संस्थे’तर्फे दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत जुलै १८६७ ते जानेवारी १९३५ या कालखंडातील शंभर अंकांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे.
मराठी साहित्यामध्ये ग्रंथरूपामध्ये असलेल्या महत्त्वपूर्ण खजिन्याचे दस्तऐवजीकरण करून हा ठेवा नव्या पिढीच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून राज्य मराठी विकास संस्थेने सी-डॅकच्या साहाय्याने २०१३ मध्ये डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेतला. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सध्या काही महत्त्वाच्या पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे. संस्थेने विविध ज्ञानविस्तार या नियतकालिकाच्या शंभर अंकांचे डिजिटायझेशन केले आहे. अर्थशास्त्र, पुस्तक परीक्षणे, नाटक, कविता, लेख, निबंध असे विविध साहित्य प्रकार या नियतकालिकामध्ये हाताळण्यात आले आहेत. हे नियतकालिक डिजिटायशेझन या स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील लेखनशैलीचा प्रत्यय देणारा महत्त्वाचा दस्तऐवज वाचकांच्या हाती आला आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर ते विनामूल्य ‘डाउनलोड’ करण्यासाठीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विविध ज्ञानविस्तार हे मराठी वाङ्मयातील महत्त्वाचे नियतकालिक मानले जाते. पुण्यातील शासकीय ग्रंथालयामध्ये त्याचे काही अंक मिळाले. त्या कालखंडामध्ये या नियतकालिकाने हाताळलेले विषय कालबाह्य़ झालेले नाहीत. डिजिटायझेशन केल्यामुळे या अंकांना चिरंतन स्वरूप लाभले आहे. भविष्यामध्ये आणखी काही महत्त्वाची पुस्तके आणि नियतकालिके डिजिटायझेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
डिजिटायझेशन झालेली पुस्तके
– ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज
– इंग्लंड देशाची बखर
–  मोरोबा कान्होबा यांनी लिहिलेले घाशीराम कोतवाल
– माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचे हिंदुस्थानचा इतिहास
– कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे संगीत मेनका
–  ह. ना. आपटे यांची माध्यान्ह, मायेचा बाजार, सूर्यग्रहण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Periodical dnyanvistar digitisation