पुण्यातील वेल्हा तालुक्याचे राजगड असे नामकरण करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे. वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, “छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे. येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला. स्वराज्याचे स्वप्न पाहिले,जपले व ते प्रत्यक्षात आणले. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात हा किल्ला आहे. त्या किल्ल्याचे नाव त्या तालुक्यात देण्यात यावे अशी आमची मागणी आहे”.

“विशेष म्हणजे जुन्या दस्तावेजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते १९४७ सालापर्यंत ‘राजगड तालुका’ असाच उल्लेख आढळतो. शासकीय मुद्रणालयाने १९३९ साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो”, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

हे सर्व मुद्दे लक्षात घेता वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. येथील जनता देखील या मागणीबाबत सकारात्मक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. आपण यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करावे अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ncp supriya sule demand velha to rename rajgad sgy