आरक्षणाच्या मागणीसाठी गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाचे नेतृत्व करणारा नेता हार्दिक पटेल याने महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मागणीला समर्थन असल्याचे म्हटले आहे. आरक्षण म्हणजे भीक नाही, असेही त्याने म्हटले. कोणत्याही परिस्थितीत आरक्षणे मिळणार असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही हार्दिक पटेल याने यावेळी  केले. पुण्यात आज, बुधवारी एमआयटी महाविद्यालयातील कार्यक्रमात तो बोलत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशद्रोहाच्या आरोपाखाली जामीनावर सुटलेला हार्दिक पटेल याला सहा महिन्यांसाठी गुजरातबाहेर जाण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला होता. या सहा महिन्यांच्या कालावधीत तो राजस्थानमध्ये राहत होता. हा सहा महिन्यांचा कालावधी संपला असून, काल मंगळवारी तो गुजरातमध्ये परतला. त्याने गुजरातमध्ये येताच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. गुजरातमध्ये परतलेल्या हार्दिक पटेलने आपली मोहीम महाराष्ट्रात सुरू केली आहे. पुण्यात आज, बुधवारी एमआयटी महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी आला होता. यावेळी त्याने भविष्यात आरक्षणासाठी लढा उभारण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी त्याने महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा आहे, असे वक्तव्य करून कोणत्याही परिस्थितीत आरक्षणे मिळणारच, असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मागणीला समर्थन असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

यावेळी हार्दिकने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. जवान, तरुण आणि शेतकऱ्यांच्या जीवावर देश चालत आहे, असे त्याने म्हटले आहे. आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्याने उपस्थितांना केले. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यास देश विश्वगुरु होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरातच्या नवाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नॅनोच्या कारखान्यात काम करावे लागत आहे, असा गंभीर आरोपही त्याने यावेळी केला.

‘हक्क मागणाऱ्या तरुणाला देशद्रोही ठरवले जाते’

मी खरे बोलतो आणि खरे बोलण्यासाठी मी कोणलाही घाबरत नाही. खरे बोलल्यामुळे नऊ महिने तुरुंगात राहून आलो आहे. माझ्याकडे फक्त पाच एकर जमीन आहे. त्यामुळे पाच एकर जमिनीपेक्षा जास्त काही मी गमवणार नाही. त्यामुळे खरे बोलत राहणार, असेही पटेल याने स्पष्ट केले. दरम्यान, देशातील युवकाने आपला हक्क मागितला तर सरकार त्याला देशद्रोही ठरवत आहे, असा घणाघातही त्याने केला.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune support maharashtra reservation says hardik patel