देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या वर्धापनदिनापासून वैचारिक स्वातंत्र्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांद्वारे मराठी मनाची मशागत करणारे ‘साधना साप्ताहिक’ आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. ‘साधना’चे सुरुवातीपासूनचे सर्व अंक ऑनलाइन युनिकोड पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने ते सहजासहजी वाचता येतील. मात्र, गेल्या २०१४ ते २०१९ या सहा वर्षांतील तीनशे अंक तीन आठवडय़ांनी प्रत्यक्ष संकेतस्थळावर पाहता येणार आहेत, तर १४ नोव्हेंबरपासून २००७ ते २०१३ या सात वर्षांतील साडेतीनशे अंक दिसणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साने गुरुजी यांनी १५ ऑगस्ट १९४८ रोजी साधना साप्ताहिक सुरू केले. गेली ७१ वर्षे अखंडपणे प्रकाशित होणाऱ्या साधनाची अमृतमहोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना ‘साधना अर्काइव्ह’ हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आकाराला येत आहे. साधनाचे २००७ पासूनचे सर्व अंक पीडीएफ स्वरूपात http://weeklysadhana.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गेल्या १३ वर्षांतील ६५० अंकांचे युनिकोडमध्ये रूपांतर करून, लेखक व विषयानुसार त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरअखेपर्यंत जवळपास साडेसहा हजार लेख वाचकांना आपल्या मोबाइलवरही वाचता येतील, असे ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी  सांगितले.

पुढील वर्षीपासून या प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात होईल. साधनाच्या पहिल्या अंकापासूनचे २००६ पर्यंतचे ५८ वर्षांतील सर्व अंक टप्प्याटप्प्याने युनिकोडमध्ये उपलब्ध होतील. हे सर्व अंक दहा वर्षांपूर्वीच स्कॅन करून ठेवले आहेत. परंतु, हे काम अधिक किचकट, वेळखाऊ  आणि खर्चिक असल्याने हा टप्पा पूर्ण होण्यास कालावधी लागेल. त्या काळातील राजकारण, समाजकारण समजून घेण्याबरोबरच नव्या पिढीच्या अभ्यासकांना जुन्या अंकांचा अभ्यास करण्यासाठी उपयोग होईल, असे शिरसाठ यांनी सांगितले.

ध्येयवादी आणि परिवर्तनवादी नियतकालिक अशीच साधनाची ओळख राहिली आहे. वैचारिक भूमिकेसंदर्भात साधना कायम पुरोगामी राहिली आहे. जात, धर्म, भाषा, प्रांत आणि लिंग या पाचही प्रमुख घटकांच्या बाबतीत समाजाने अधिकाधिक उदारमतवादी, सहिष्णू होत जावे, असा सूर लेखनातून व्यक्त झाला आहे. ‘विषमता आणि वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करायची आहे,’ हे साने गुरुजी यांनी पहिल्या अंकाच्या संपादकीयमध्ये केलेले निवेदन हाच साधनाचा मूलाधार राहिला आहे, याकडे शिरसाठ यांनी लक्ष वेधले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadhana weekly is now in digital form abn