पैशाचा मोह आणि अनैतिक संबंधातून साताऱ्यातील भोंदू डॉक्टर संतोष पोळने सहा खून केल्याचे उघड झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. याच पोळचे बनावट नोटांच्या रॅकेटशी काही ‘कनेक्शन’ आहे का, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. कारण, चार महिन्यापूर्वी देहूरोडमध्ये पोळने लाखो रूपयांचे बनावट नोटांचे रॅकेट पकडून दिल्याचा दावा केला होता. त्याचे खरे स्वरूप उघड झाल्यानंतर त्या प्रकरणात काळंबेरं असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोळ व त्याचे दोन सहकारी २५ एप्रिल २०१६ ला देहूरोड पोलीस ठाण्यात आले होते. उदगीरमधील दोन जण बनावट नोटा खपवण्याचा धंदा करत असून त्यांना देहूरोड पोलिसातील काही जण मदत करत असल्याचा आरोप त्याने केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाईची मागणी त्याने देहूरोड पोलिसांकडे लावून धरली होती. पोलीस त्याच्या तक्रारीकडे फारसे गांभीर्याने पाहत नव्हते. तेव्हा पोळने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना, पोलिसांकडून आरोपींना वाचवण्यात येत असल्याचा कांगावा केला. पोळच्या दबावामुळे पोलिसांनी तेव्हा नांदेडच्या एका संशयितास अटक केली होती. हाच पोळ आता सहा खुनांचा ‘मास्टर माईन्ड’ निघाल्याने देहूरोड पोलीस चक्रावून गेले आहेत. बडय़ा अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे दाखवून पोळ पोलीस कर्मचाऱ्यांनाच दमात घेत होता. वेळप्रसंगी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांनाच ब्लॅकमेल करत होता, अशा तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh pol fake currency racket