लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केल्याच्या रागातून डेक्कन येथील दोघांनी महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना सुमारे दोन तास डांबून ठेवले. त्यांच्या अंगावर कुत्रे सोडले. पोलिसांनी या महिला कर्मचाऱ्यांची सुटका केली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
डेक्कन उपविभाग अंतर्गत महिला तंत्रज्ञ करुणा आढारी आणि रूपाली कुटे बुधवारी (२७ सप्टेंबर) दुपारी सव्वातीन वाजता प्रभात रस्ता परिसरात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे शासकीय कर्तव्य बजावत होत्या. दरम्यान, सरस्वती अपार्टमेंटमधील वीजग्राहक आरती ललित बोदे यांच्याकडे ५ हजार २०६ रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर ग्राहकाकडून तात्काळ वीजपुरवठा सुरु करण्यास ऑनलाइन वीजबिल भरण्यास नकार देत धनादेश स्वीकारण्यास सांगण्यात आले. मात्र, आम्हाला स्वतः धनादेश स्वीकारता येत नाही असे या महिला तंत्रज्ञांनी सांगितल्यावर आरती बोदे आणि ललित बोदे यांनी त्यांना शिवीगाळ सुरू केली. नाईलाजाने या महिला तंत्रज्ञ तिसऱ्या मजल्यावरून खाली जाण्यास निघाल्या असता त्यांना लिफ्टमधून जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर त्या जिन्यातून जात असताना बोदे आणि रखवालदाराकडून जिन्याचे सेफ्टी डोअर बंद करण्यात आले. त्यामुळे या दोघी तंत्रज्ञ जिन्यात अडकल्या. त्याचवेळी त्यांच्यावर दोन कुत्रे सोडण्यात आले. कुत्रे त्यांच्यावर भुंकत असताना आढारी आणि कुटे यांनी तत्काळ महावितरणच्या कार्यालयात आणि पोलीस ठाण्यात संपर्क साधला.
आणखी वाचा-VIDEO: गणेश विसर्जन मिरवणुकीत थेट कोयता गँगच्या विरोधातच देखावा! पाहा भन्नाट कलाकृती
या प्रकारानंतर महावितरणचे स्थानिक कार्यालयातील अभियंते आणि कर्मचारी या इमारतीमध्ये आले. त्यांनी डांबून ठेवलेल्या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना सोडण्याची विनंती केली. मात्र, त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने दाखल झाले आणि साडेचार वाजता या दोन्ही महिला तंत्रज्ञांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी महावितरणकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर डेक्कन पोलीस ठाण्यात आरोपी ललित बोदे आणि आरती ललित बोदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.