पादचाऱ्यांसाठी पदपथ कसे मोकळे राहतील तसेच पादचाऱ्यांना प्रमुख चौकांमध्ये रस्ते ओलांडण्याची चांगली व्यवस्था कशी उपलब्ध होईल, याकडे लक्ष देण्याऐवजी महापालिकेने पादचाऱ्यांसाठी पूल आणि भुयारी मार्ग बांधण्याचा उपाय शोधला असून या दोन्ही उपाययोजना शहरात संपूर्णत: अपयशी ठरल्याचे चित्र आहे. शहरातील पादचारी उड्डाणपुलांचा आणि पादचाऱ्यांसाठी केलेल्या भुयारी मार्गाचा वापर पादचारी फारच क्वचित करतात. त्यामुळे हे सर्व पूल व भुयारी मार्ग सध्या बंद अवस्थेत आहेत.
पदपथ नसलेल्या रस्त्यांवर पदपथांची बांधणी, नव्याने बांधलेले पदपथ उखडून तेथे इंटर लॉकिंग ब्लॉक्स बसवणे, ते उखडून तेथे बाथरूम टाईल्स बसवणे असे उद्योग पुण्यात नगरसेवक आणि प्रशासनाकडून वर्षभर सुरू असतात. या कामांवर दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्चही होतात. मात्र एवढा मोठा खर्च करून बांधलेले पदपथ पादचाऱ्यांना वापरता येत नाहीत, ही शहरातील वस्तुस्थिती आहे. एकदा पदपथ तयार झाला की त्याच्यावर लगेचच विक्रेत्यांची अतिक्रमणे सुरू होतात आणि पादचाऱ्यांसाठी पदपथ बंद अशी परिस्थिती होते.
गर्दीच्या चौकांमध्ये पादचाऱ्यांना सहजपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी शहरात काही ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. कोथरूड भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, हे पूल अशास्त्रीय पद्धतीने बांधण्यात आल्यामुळे या पुलांचा वापर करून रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधलेला असा उड्डाणपूल तीन- चार वर्षे विनावापर राहिला होता. अखेर तो कात्रजजवळ सातारा रस्त्यावर बसवण्यात आला. मात्र तेथेही तीच परिस्थिती कायम राहिली. अशाच प्रकारे शहरात जेथे जेथे पादचाऱ्यांसाठी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत त्यातील एकाही पुलाचा वापर पादचाऱ्यांकडून होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना तर या पुलांवर जाणेच अवघड आहे, इतके ते उंच आहेत. या पुलांची उंची लक्षात घेऊन नव्याने बांधलेल्या पुलांसाठी लिफ्ट बसवण्यात आल्या असल्या तरी त्या कधीही सुरू नसतात. त्यामुळे या पुलांवर केवळ लाखो रुपयांचा खर्च होतो आणि उद्घाटनांचे सोहळे होतात. त्यानंतर त्यांची दुरवस्था सुरू होते.
पादचारी पूल बांधण्याआधी शहरात पादचाऱ्यांसाठी प्रमुख चौकांमध्ये भुयारी मार्ग बांधण्याचे काम मोठय़ा प्रमाणात करण्यात आले होते. या भुयारी मार्गापैकी डेक्कन जिमखाना परिसरात बांधण्यात आलेल्या शहरातील पहिल्या भुयारी मार्गाचा वापर वगळता इतर सर्व भुयारी मार्ग बंद अवस्थेत आहेत. डेक्कन जिमखाना येथील भुयारी मार्गाचा वापर पादचारी सहजरीत्या करू शकत असल्यामुळे रोज मोठय़ा प्रमाणात त्याचा वापर होतो. अन्य काही भुयारी मार्ग तर आता महापालिका प्रशासनानेच बंद केले आहेत. या भुयारी मार्गासाठी महापालिकेने फार मोठा खर्च केला आहे. मात्र वापर होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातील अनेक प्रकारची सामग्री चोरीला गेली आहे. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतरही दोन महिन्यांपूर्वी पौड रस्त्यावर आणखी दोन पादचारी मार्ग बांधण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयावर मोठी टीका झाल्यानंतर तूर्त तो स्थगित ठेवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी खरोखरच गरज आहे अशा ठिकाणी हे मार्ग बांधण्यात आलेले नाहीत. तसेच पादचाऱ्यांचा विचार करून ते बांधलेले नाहीत. त्यामुळे ते पादचाऱ्यांसाठी गैरसोयीचे झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगा कसं चालायचं..?
तुमचेही अनुभव/सूचना कळवा
पादचारी वाहतुकीकडे पूर्ण दुर्लक्ष झालेल्या शहरात पदपथांवरून आणि रस्त्यांवरून चालताना काय अनुभव येतात, कोणत्या समस्यांना पादचाऱ्यांना तोंड द्यावे लागते, त्यावर काय उपाय करता येतील, यासंबंधी पुणेकरांनी पाठवलेल्या अनुभवांचे व सूचनांचे स्वागत आहे. आपले म्हणणे शंभर ते सव्वाशे शब्दांपर्यंत असावे. नाव, पत्ता, संपर्क क्रमांकही देणे आवश्यक.
मजकूर पाठवण्यासाठीचा पत्ता :
संपादक, दै. लोकसत्ता, एक्सप्रेस हाऊस, १२०५/२/६ शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे- ४११ ००५.
ई मेलवर मजकूर पाठवायचा असल्यास :
’‘२ं३३ं.स्र्४ल्ली@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unuseful footpaths closed underground roads