पुणे : शहरातील अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांच्या आणि पंधरा ते अठरा वयोगटाच्या शनिवारच्या लसीकरणासाठी महापालिकेने एकूण २३१ केंद्रे निश्चित केली आहेत. यातील पंधरा ते अठरा वयोगटासाठी स्वतंत्र ४० केंद्रे असतील. अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी एकूण १९१ केंद्रे असून त्यामधील १८० केंद्रांवर कोविशिल्ड लशीची मात्रा दिली जाईल, तर अकरा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लशीची मात्रा दिली जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या १९१ केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना वर्धक मात्रा देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पंधरा ते अठरा वयोगटासाठीच्या प्रत्येक केंद्रांना कोव्हॅक्सिन लशीच्या प्रत्येकी शंभर मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील पन्नास टक्के मात्रा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर तर उर्वरित पन्नास टक्के मात्रा थेट केंद्रात नावनोंदणी केल्यानंतर दिली जाईल.

अठरा वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी कोविशिल्डची १८० तर कोव्हॅक्सिनची ११ केंद्रे असतील. तीस ऑक्टोबरपूर्वी किंवा पहिली मात्रा घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना उपलब्ध लशीपैकी २० टक्के मात्रा देण्यात येईल. ऑनलाइन नोंदणी शनिवारी सकाळी आठ वाजता सुरू होईल. कोव्हॅक्सिनच्या अकरा केंद्रांना प्रत्येकी शंभर मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंचवीस डिसेंबरपूर्वी किंवा पहिली मात्रा घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना दुसरी मात्रा दिली जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaccination at 231 centers 40 separate centers for children zws