पृथ्वीचा जन्म कसा झाला, याबद्दल जगातील वैज्ञानिक आपले सारे आयुष्य खर्ची घालत असताना, या पृथ्वीच्याच पोटात दडलेल्या अज्ञाताचा शोध घेण्याची वृत्ती माणसाला स्वस्थ बसू देत नाही. मधुकर केशव ढवळीकर यांच्यासारख्या संशोधकाने आपले सारे आयुष्य अज्ञातातून ज्ञाताकडे नेण्यासाठी उपयोगात आणले. पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या शोधात गेल्या काही हजार वर्षांत जे नवे गवसले, त्याने माणसाला आपल्याच इतिहासाचा धांडोळा घेता आला. इतिहास म्हणजे घडून गेलेली गोष्ट. त्यात कसला बदल होणार, या कल्पनेला या संशोधनाने हादरे दिले आणि त्यातून इतिहास हाही सर्जनाचाच आविष्कार असतो, याचे भानही आले. पुरातत्त्वशास्त्राच्या विकासात डॉ. ढवळीकर यांच्यासारख्या भारतीय संशोधकाने जी मोलाची भर घातली, त्यामुळे मानवी इतिहासाच्या पाऊलखुणांचा शोध घेण्याची ऊर्मी नव्या संशोधकांनाही मिळाली. भूतकाळाबद्दलचे कुतूहल ही मानवी स्वभावातील एक अटळ गोष्ट असते आणि त्याचा शोध शास्त्रशुद्ध पद्धतीने घेण्याच्या नवनव्या संकल्पना पुढे येत गेल्या. डॉ. ढवळीकर यांनी त्यातही खूपच मोलाची भर घातली. गेली सुमारे पन्नास वर्षे ते संशोधनमग्न होते आणि त्यामुळे समाजात आपले संशोधन मिरवण्याची गरज त्यांना कधी वाटली नाही. पुण्यातील डेक्कन कॉलेज या संस्थेत पुरातत्त्वशास्त्राचे अध्यापक, नंतर विभागप्रमुख आणि संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी केलेले काम त्यांच्या निवृत्तीनंतरही नंदादीपासारखे तेवत राहिले आहे. पुणे विद्यापीठातून १९५८ मध्ये त्यांनी एम.ए. ही पदवी पहिल्या वर्गात सर्वप्रथम येऊन मिळवली आणि नंतर तेथेच पीएच.डी.साठीचे संशोधनही केले. भारतीय पुरातत्त्व विभागात त्यांनी कामाला सुरुवात केली आणि नंतर नागपूर विद्यापीठात प्रपाठक म्हणूनही काम केले. त्यानंतरचा सारा काळ डेक्कन कॉलेज या संस्थेतच व्यतीत केला. पुरातत्त्वशास्त्राच्या अध्यापनात प्रत्यक्ष संशोधनाला फारच महत्त्व असते. ठिकठिकाणी जाऊन उत्खनन करून इतिहासाची उलगड करणे हे काम कष्टाचे असते.  डॉ. ढवळीकर यांनी भारतातील अनेक ठिकाणी असे उत्खनन करण्यात पुढाकार घेतला. भारत आणि ग्रीस या दोन्ही ठिकाणच्या संस्कृतींचा उदय एकाच कालखंडातील मानला जातो. त्यामुळे त्या देशातील उत्खननाचा भारतीय संदर्भात अभ्यास करण्याची संधीही त्यांना मिळाली. भारत सरकारने त्यांना ग्रीसमधील पेला या ठिकाणच्या उत्खननासाठी मुद्दाम पाठवले होते.  डॉ. ह. धी. सांकलिया यांच्यासारख्या ज्येष्ठ संशोधकाचा ढवळीकर यांना सहवास लाभला. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातील इनामगाव येथील उत्खननात ढवळीकर यांचा मोठाच सहभाग होता. त्याबाबतचे निष्कर्षही अतिशय महत्त्वाचे मानले जातात. या साऱ्या संशोधनामुळे त्यांना मोठी ग्रंथसंपदाही निर्माण करता आली. ‘आर्याच्या शोधात’, ‘नाणकशास्त्र’, ‘पर्यावरण आणि संस्कृती’, ‘पुरातत्त्व विद्या’, ‘भारताची अभ्यासपूर्ण कुळकथा’ यांसारख्या मराठी ग्रंथांबरोबरच इंग्रजीतूनही त्यांनी विपुल लेखन केले. महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्षपद, इंडियन आर्कियॉलॉजिकल सोसायटीच्या वाराणसी येथील अधिवेशनाचे अध्यक्षपद इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्षपद, भारत सरकारची पद्मश्री, पंतप्रधानांचे सुवर्णपदक यांसारखे सन्मान ही त्यांच्या कर्तृत्वावरची ठसठशीत मोहोर होती. अगदी अलीकडे महाभारताचा काळ निश्चित करण्याबद्दलचे त्यांचे संशोधन खूप गाजले. संशोधन ही डॉ. ढवळीकर यांची जीवनप्रवृत्ती होती. आयुष्यभर माणसाच्या आणि प्राणिमात्रांच्या उत्क्रांतीचा शोध घेत राहणाऱ्या या संशोधनव्रतीचे निधन ही एक अतिशय क्लेशदायक घटना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhukar keshav dhavalikar