ख्रिस मिलर यांच्या ‘चिप वॉर’ या पुस्तकाला नुकतेच ‘द फायनान्शियल टाइम्स’च्या ‘बेस्ट बिझनेस बुक ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. असे काय आहे या पुस्तकात? या प्रश्नाचे उत्तर हवे असेल, तर ज्यांनी कोविड साथीच्या आणि त्यानंतरच्या काही काळात वाहनांची नोंदणी केली, त्यांना विचारा. महिनोन महिने वाट पाहूनही गाडी काही हाती येत नव्हती आणि त्यामागचे महत्त्वाचे कारण होते, इलेक्ट्रॉनिक चिपचा तुटवडा. ही समस्या जगभरात सर्वत्र उद्भवली होती आणि आजही तिचे चटके बसत आहेत. हा तुटवडा निर्माण झाला होता सेमीकंडक्टर्सच्या अनुपलब्धतेमुळे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोबाइल फोन, वॉशिंग मशिनपासून कार, क्षेपणास्त्र आणि अणुबॉम्बपर्यंत अनेक उपकरणांमधील अविभाज्य घटक म्हणजे सेमीकंडक्टर! कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणातील विजेचा प्रवाह नियंत्रित ठेवणे हे या घटकाचे महत्त्वाचे कार्य. चीन हा त्याचा प्रमुख पुरवठादार. कोविडकाळात ही पुरवठासाखळी तुटली आणि जगभर सेमिकंडक्टर्सचा तुटवडा भासू लागला. याचा सर्वात मोठा फटका बसला, तो वाहन उद्योगाला.

अमेरिकेतील ‘फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी’मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे प्राध्यापक असणाऱ्या  ख्रिस मिलर यांना खरेतर क्षेपणास्त्र या विषयावर लेखन करायचे होते. त्यावर अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आले की क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात जो विकास झाला आहे, त्याला कारण आहेत अतिशय आधुनिक संगणक आणि या संगणकांना एवढे सक्षम करणारा घटक आहे इलेक्ट्रॉनिक चिप. पण या अतिमहत्त्वाच्या घटकाचे महत्त्व जाणण्यात युरोप, अमेरिका मागे पडले आणि हे क्षेत्र चीन, जपान, तैवान अशा आशियाई देशांच्या मुठीत आले. जागतिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील ही गणिते ख्रिस रंजक पद्धतीने मांडतो. त्याचबरोबर या क्षेत्रातील घडामोडींचे जागतिक अर्थकारण आणि भूराजकीय समीकरणांवर होणारे परिणामही स्पष्ट करतो.

या पुस्तकाचे वर्णन करताना ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे की, ‘हे चायना सिंड्रोम आणि मिशन इम्पॉसिबल चे समप्रमाणातील मिश्रण वाटावे असे नॉन फिक्शन थ्रिलरसारखे पुस्तक आहे. चिपसारख्या क्लिष्ट विषयासंदर्भात असूनही वाचकांना गुंतवून ठेवण्याची क्षमता या पुस्तकात आहे.’

‘बेस्ट बिझनेस बुक ऑफ द इयर’ हा पुरस्कार उद्योग क्षेत्रापुढील आजच्या काळातील आव्हानांचे सर्वाधिक उत्सुकतावर्धक आणि रंजक पद्धतीने चित्रण करणाऱ्या पुस्तकाला प्रदान करण्यात येतो. पुरस्कार ३० हजार पाऊंड एवढय़ा रोख रकमेचा आहे. धोरणकर्त्यांनी आणि उद्योगक्षेत्रातील व्यक्तींनी वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bookbatmi chip solution to global complexity chris miller chip war to the book ysh