राजेश बोबडे  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कलियुगातील माणसाच्या अध:पतनावर प्रकाश टाकताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, घर फिरल्यावर आढे फिरते की आढे फिरले म्हणजे घर फिरते हा प्रश्न मला त्रास देऊ लागला. पण हे खरे की आढय़ाबाशांचा तोल अधिक सुटला – म्हणजे त्यांनी घराच्या विशिष्ट शिस्तीला फाटा दिला म्हणजे घर फिरले असाच अर्थ होतो. हीच स्थिती आज आमच्या संस्थांची, धर्माची, भाविकवृत्तीची झालेली आहे. तत्त्वज्ञानाला कोण पुसतो? आम्ही सांगू तेच तत्त्वज्ञान, आम्ही म्हणू तोच कायदा आणि आम्हाला आवडेल तेच अमृत-भोजन असे झाले आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ लावण्यात पांडित्य खर्ची पडत आहे. आणि या वृत्तीला साथ देणारे वकील शेकडय़ांनी आहेत. सवाल असा आहे की, आपण आपले मृत्युपत्र करूनही आपला मानस पूर्ण होईल की नाही अशी भीती निर्माण झाली आहे. मग संतांनी व श्रेष्ठांनी दिलेल्या आज्ञेचे अनेक अर्थ करून त्यांचे अनेक संप्रदाय वाढवले जातील यात काय शंका आहे? मंदिर केले उपासनेसाठी पण ते पूर्ण होताच भांडणे तिथे जाऊन बसतात.

हेही वाचा >>> चिंतनधारा: गोपालकाल्यातून क्रांतीची स्फूर्ती

आश्रम केले प्रचारासाठी पण सत्ता व राजकारणाचे आसन तिथे स्थिर होते. तीर्थ केले मानवाच्या उन्नतीसाठी पण तिथे दुकानदारीच येऊन बसली. मोठी माणसे देवाने पाठविली समाजाच्या हितासाठी, पण काही लोकांच्या पोटासाठीच त्यांचा उपयोग होताना दिसतो. आता हा फरक कसा मिटवावयाचा हा मोठा प्रश्न आहे. माझ्या मते स्वतंत्र संप्रदाय निर्माण करून हे सर्व प्रश्न सोडवण्याची सोय होऊ शकते. पण या नवीन संप्रदायातही कलह निर्माण होणार नाहीत याची खात्री कोणी द्यावी? संत कबीराला हा विचार एकदा सुचला असावा पण त्याच्या शेवटशेवटच हा संप्रदाय बनला व मग ताहीर लोक गुरू नानकाच्या संप्रदाय-मीलनाला, शीख लोक आमचा हा धर्म आहे असे जाहीर करून कायदा करू लागले आहेत. याला काय उपाय? एक उपाय आहे की, सत्तारूढ सज्जनांनी या संतांच्या सूत्राप्रमाणे त्याला संरक्षण द्यावे पण त्यात हात घालणे म्हणजे त्यांच्या सत्तेला धोका होणे असे वाटते आणि म्हणूनच शासनसुद्धा सध्या व्यक्तीच्या मर्यादानुसार देशाची हानी उघडय़ा डोळय़ांनी बघत आहे.

हेही वाचा >>> चिंतनधारा: कृष्णजन्माष्टमी व गीतेचे तत्त्वज्ञान

आता दुसरा उपाय घोर संघर्ष होऊन त्यात न्यायनिष्ठ तपस्वी पुढे येणे हाच राहिला आहे. पण गुणी जनांच्या अंगी अशा प्रकारचा आततायीपणा नसल्यामुळे त्यांचे कार्य विवेकाच्या आधाराने चालत असते. आणि विवेकाच्या मागे विलंब स्वाभाविकपणे उभा राहत असतो. शेवटी सज्जनांचा दुवा जोडल्याशिवाय कोणतेही राज्य, धर्म वा समाजसंस्था जगत नसते. पण यात भेसळ, गल्लत झाल्याशिवाय कसोटीलाही कोणी लागू नये असा हा काळवेळ आला आहे. समाजाचे दु:ख पाहण्यापेक्षा मरणे बरे असे म्हणणारे साधुसंतही याच देशात जन्मले आहेत. पण त्यांच्या मरणाने तरी किती जण शहाणे झाले? किती लोकांनी धडा घेतला? असे हे चालणारच म्हणावे तर मनाला समाधान वाटत नाही. नेहमी वाटते मरायचेच आहे तर काही उत्तम करून मरावे. मरणानंतर आपली आठवण देशाला येत राहील. अमुक एका सत्कार्यासाठी हा माणूस मेला, शहीद झाला, संत झाला, संशोधक झाला, वीर झाला, अन्यायाचा प्रतिकार करणारा झाला आहे असे त्याच्या मरणानंतर जग म्हणेल.

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj talk about degradation in the age of kali yuga zws