गोपालकाल्यासारखे धार्मिक समजले जाणारे कार्यक्रम आपण वर्षांनुवर्ष करीत आहोत, त्यांचा उद्देश जाणून घेतला पाहिजे; तरच यांचा उपयोग. एकीकडे देव नि दुसऱ्या बाजूला असुर यांनी समुद्रमंथनातून चौदा रत्ने काढल्याचे आपण ऐकतो. सध्याच्या समुद्रमंथनांतून आम्हाला आता ‘लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा’ अशी रत्ने नको आहेत. लक्ष्मीऐवजी आमच्या भूमीचा सवाल आज सुटायला पाहिजे. पारिजातकाऐवजी अधिक आज धान्याची गरज आहे. अन्यायाची चीड व सत्याची चाड असणाऱ्या लोकांची शक्ती संघटना वाढवून राष्ट्राचे भाग्य उजळले पाहिजे. भगवान श्रीकृष्णानेसुद्धा हेच केले. गोपालांना जमवून काला करण्यात त्याचा हाच हेतू होता. कृष्णाच्या घरी दहीदूध व लोणी मिळत नव्हते की काय? त्याच्या घरी नऊ लाख गायी होत्या म्हणून जे पुराणिक सांगत आहेत त्या सर्वच गायी भाकड होत्या काय ? मग त्याचा ‘काला’ करण्यात हेतू काय असावा ? काला हे एक निमित्त होते. सर्व सात्त्विक जनांना एकत्र करून संघटितपणे कार्य करण्याची स्फूर्ती देणारा तो मार्ग होता. सर्वाना वर आणण्याचे साधन म्हणून श्रीकृष्णाने त्याचा उपयोग केला. पंढरपुरास होणारा काला संतांनी याच दृष्टीने सुरू केला होता; पण आज काय स्थिती आहे? लोक काल्याचा कण, दहीहांडीचा शिंतोडा नि लाही मिळावी म्हणून हजारोंना धक्के देत पुढे धसतात; हांडक्यात हात घालून खायला मिळाले की ते मोठय़ा आनंदाने हात जोडून म्हणतात – ‘हा : हा ! इठ्ठला, धन्य लीला हाये रे बापा तुही !’ पण त्या विठ्ठलाच्याच मानवी रूपातील शंभर मूर्तीना धक्के व लाथा लावीत आल्याबद्दल त्याला काहीच वाटत नाही. त्या गर्दीत कोणी चेंगरून मेला तरी पर्वा नाही.

या गाढवपणाने कसले पुण्य होणार ? ‘गव्याला दिले पाप ना पुण्य’ असा जमाखर्च बरोबरच होऊन जातो, गावागावात हीच गोष्ट दिसून येते. आपण दहीपोह्यांनाच काला समजतो, पण चूक आहे ते. कृष्णाने दहीपोह्यांचा सोवळा काला केला नव्हता. गोपालांच्या घराघरात जे शिजले होते त्याच्या शिदोऱ्या एकत्र करून त्याने वनात ते सर्वाना एका पंक्तीत, समभावनेने मिळून मिसळून खायला दिले होते, कारण, कंसाच्या दमननीतीमुळे गावात संघटित होणे अशक्यप्राय झाले होते; म्हणूनच जंगलात संघटना वाढवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने हे निमित्त उपयोगात आणले. ‘‘काला खाल्ला की पुण्य झाले’’ यासाठी ते नव्हते; तर त्यातून क्रांतीची स्फूर्ती त्याला निर्माण करावयाची होती. काल्याच्या निमित्तानेच कृष्णाने गावकऱ्यांच्या अंगी सत्याचे अपूर्व तेज निर्माण केले, सामथ्र्य वाढवले, क्रांतीची भूमिका या काल्यातूनच त्याने मजबूत केली होती. समाजात सत्याची चाड वाटणारे लोक पुढे आणून, त्यांच्यात अन्यायाची चीड निर्माण करून आणि त्यांच्या संघटनेद्वारे त्यांचे सामथ्र्य वाढवूनच समाजाचे दुर्भाग्य बदलता येते; याशिवाय दुसरा मार्ग नाही. एकटा दुकटा पुढारी सर्वाच्या जीवनाचे प्रश्न सोडवू शकत नाही. या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्या काल्याच्या निमित्ताने आवडत्या गोपालांकडून भगवान श्रीकृष्णाने नव्या राष्ट्राचा पाया घातला.

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

राजेश बोबडे