पुस्तकप्रेमींमध्ये आकर्षणाचा विषय असणारा नवी दिल्ली येथील ‘विश्व पुस्तक मेळा’ २५ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान प्रगती मैदानावर भरणार आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ ही यंदाच्या मेळय़ाची संकल्पना आहे. फ्रान्समधील साहित्यविश्वावर या मेळय़ात विशेष प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. मेळय़ाचे आयोजन ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या संकल्पनेअंतर्गत स्वातंत्र्यलढय़ात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींवरील विविध भाषांतील २००हून अधिक पुस्तके प्रदर्शित केली जाणार आहेत. याव्यतिरिक्त नवीन शैक्षणिक धोरणाविषयीच्या पुस्तकांचाही विशेष विभाग असणार आहे.
मेळा दरवर्षी रसिकांना विविध देशांतील साहित्यविश्वात डोकावण्याची संधी मिळवून देतो. यंदा मेळय़ातील अतिथी देशाचे स्थान फ्रान्सला देण्यात आले आहे. तेथील ५० हून अधिक लेखक, साहित्यिक आणि प्रकाशक मेळय़ात उपस्थित राहणार आहेत. नोबेल विजेत्या फ्रेंच लेखिक अॅनी एरनॉक्स आणि फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युल लेनेन मेळय़ात सहभागी होतील.
नवोदित लेखकांना खास व्यासपीठ देण्यात येणार असून बालकांसाठीही विशेष विभाग असणार आहे. मेळय़ात साहित्य आणि संस्कृतीवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त अनेक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. २०२१मध्ये विश्व पुस्तक मेळा कोविडच्या महासाथीमुळे आभासी स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. तेव्हा ७० देशांतील २८ लाख पुस्तकप्रेमी त्यात सहभागी झाले होते.
कोविडकाळात मंदावलेल्या वाचनव्यवहाराला चालना देण्याच्या दृष्टीने हा मेळा महत्त्वाचा ठरणार आहे. साहित्यिक, प्रकाशक आणि वाचक प्रत्यक्ष एकत्र येत असल्यामुळे प्रकाशन व्यवसायाला चालना मिळण्याची शक्यता आहे.