बॉम्बे हाऊसमध्ये- म्हणजे टाटा समूहाचं मुंबईतलं मुख्यालय- इथं काम करणारे सांगतात- भारतातल्या सगळय़ात मोठय़ा उद्याोगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा जेव्हा या इमारतीत आपल्या कार्यालयात येण्यासाठी शिरतात..

तेव्हा काहीही वेगळं होत नाही!

म्हणजे एरवी एखाद्या छोटय़ा-मोठय़ा उद्योगपतीच्या कार्यालयात त्याच्यासाठी स्वतंत्र लिफ्ट असते. तो यायच्या आधी त्याचे भालदार-चोपदार ‘बाजू व्हा.. बाजू व्हा’ असं म्हणत तिथे असलेल्या इतरांना उगाचच लहान वाटायला लावत असतात. पण रतन टाटा जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये शिरतात तेव्हा यातलं काहीही होत नाही. त्यांची गाडी आली की पहिल्यांदा दारात बसलेल्या कुर्त्यांना आनंद होतो. आता एवढय़ा मोठय़ा उद्योगपतीच्या दारी कुत्रे असणं नवीन नाही. पण बॉम्बे हाऊसमधले कुत्रे म्हणजे खरे कुत्रे. चार पायांचे. समस्त टाटा कुटुंबियांना त्यांचं प्रचंड प्रेम. रतन टाटा यांची गाडी आली की हा सारमेय संप्रदाय त्यांच्या गाडीभोवती जमतो. गाडीतून उतरले की लोक काय म्हणतील वगैरे विचार न करता रतन टाटा त्यातल्या काहींना थोपटतात. लाड करतात. ‘दीज इंडियन डॉग्ज..’ वगैरे शब्द त्यांच्या तोंडात काय, मनातही येत नाहीत. आणि मग ते लिफ्टच्या रांगेत उभे राहतात. इतर कर्मचाऱ्यांसारखे. म्हणजे त्यांच्यासाठी लिफ्ट राखून वगैरे ठेवली जात नाही. आपण कोण आहोत, काय आहोत, हे हा माणूस कधीही मिरवत नाही. पेज-थ्रीच्या उथळ आणि उठवळ पार्ट्यांत पाचकळपणा करताना दिसत नाही. आणि उद्योगपतींच्या मतलबी गराडय़ातून स्वत:ला अलगद वेगळं ठेवू शकतो. स्वत:च्या घरासाठी २०-२५ मजल्यांचा इमला उभारणं टाटांना सहज शक्य आहे. पण ज्या शहरात ६५ टक्के जनतेच्या डोक्यावर आभाळाशिवाय काहीच नाही, त्या शहरात असं राहणं बरं नाही, हे त्यांना जाणवतं. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यासारखे ते फ्लॅटमध्ये राहतात. आणि शनिवारी आपले दोन जर्मन शेफर्ड कुत्रे आणि ते स्वत:च्या छोटय़ा यंत्रहोडीतून अलिबागला जातात.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish kuber article on ratan tata published in 2012 lokrang supplement css