कुठे सीएनजी आधारित विद्युतदाहिन्या, कुठे ‘केमिकल हायड्रॉलिसिस’ प्रक्रिया.. देशोदेशी अन्त्यसंस्काराच्या पद्धती बदलत आहेत. त्यात मेलेल्यांच्या पुढील प्रवासापेक्षा मागे राहिलेल्यांच्या जगण्याची काळजी आणि पर्यावरणाची चिंता आहे. आपल्या केंद्रीय मंत्री उमा भारती यांना मात्र त्याचे काय? त्यांच्या दृष्टीने जाळावे ते कसे हाच खरा ज्वलंत प्रश्न आहे.
केंद्रीय जलसंसाधनमंत्री सुश्री उमा भारती यांचा अध्यात्मातील अधिकार किती थोर याची आम्हांस कल्पना नाही. परंतु तो जरा जास्तच थोर असावा. याची कारणे दोन. एक म्हणजे तसे नसते तर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलेच नसते. उमाबाई या ओबीसी नेत्या आहेत किंवा त्यांच्या समावेशाने मंत्रिमंडळास भगवा रंग येऊन भगवी मंडळी खूश होतील ही काही मोदी यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट असू शकत नाही. दुसरे कारण म्हणजे त्यांचा अधिकार थोर नसता तर त्यांना जगातील यच्चयावत् गोष्टींचे अगाध ज्ञान झालेच नसते. त्यांच्या या अमर्याद बुद्धिमत्तेचे दर्शन वेळोवेळी भारतातील कोटय़वधी अज्ञ जनांना होतच असते. गेल्या महिन्यात ते केदारनाथ खोऱ्यातील महाप्रलयानंतरच्या पुनíनर्माणाच्या कामासंबंधी झालेल्या चर्चेदरम्यान झाले. डेहराडूनला ही चर्चा झाली. बडी बडी तज्ज्ञ मंडळी त्या विचारमंथनात सहभागी झाली होती. उमाजींनी त्यांच्यासमोर भाषण करून त्यांना बऱ्याच वैज्ञानिक गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांच्यासमोरचा मूळ प्रश्न होता केदारनाथ खोऱ्यात असा महाप्रलय आलाच कसा? पुनíनर्माण वगरे ठीकच आहे. ते होतेच. परंतु खरा प्रश्न नसíगक प्रकोपाची कारणे शोधून काढण्याचा असतो. उमाजींनी ती कारणे आपल्या दिव्य अभ्यासातून शोधलीसुद्धा. त्या म्हणाल्या, विटाळामुळे ही वाताहत झाली. केदारनाथ हे पवित्र तीर्थक्षेत्र. त्याभोवती सरस्वती आणि मंदाकिनी या नद्यांनी नसíगक हद्द तयार केली होती. त्या हद्दीत मानवी मलविसर्जनाला मज्जाव होता. हे सगळे १८८२ पर्यंत. नंतर तेथे व्यापाराच्या उद्देशाने नास्तिक मंडळी आली. त्यांनी तेथे मलविसर्जनास प्रारंभ केला आणि त्या विटाळाने निसर्ग कोपला. तेव्हा महाप्रलय रोखण्यासाठी आधी मलविसर्जन रोखले पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या शौचालयनिर्मिती मोहिमेस उमाजींच्या या तर्काधिष्ठित शोधाने केवढे बळ लाभणार आहे याची केवळ कल्पनाच केलेली बरी. हे झाले केदारनाथच्या महाप्रलयाबाबत. उमाजींकडे गंगेच्या शुद्धीकरणाचीही जबाबदारी आहे. तेव्हा त्याबाबतही त्यांच्याकडे काही क्रांतिकारी विचार आहेत. नुकतेच तेही त्यांनी मांडले.
हिंदू धर्मामध्ये विविध संस्कारांना अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. त्यातील एक म्हणजे अन्त्यसंस्कार. तो नीट झाला तर पुढचे सगळे म्हणजे स्वर्गात एखादी सदनिका मिळणे वगरे सुकर होणार. अन्यथा त्या जीवास पुन्हा ८४ लक्ष योनींची स्थानके घ्यावी लागणार. मात्र महापवित्र गंगा नदीकिनारी दहनसंस्कार केला आणि अर्धवट जळालेला मृतदेह गंगार्पण केला तर मात्र त्या आत्म्यास थेट मोक्षच. ही हिंदूंची परंपरा. परंतु हल्ली सगळ्याच परंपरांना हरताळ फासला जात आहे. दहनसंस्कारात चक्क विजेचा वापर केला जात आहे. एक तर वीज हा पाश्चात्त्यांचा शोध. त्यात विजेच्या दाहिन्यांमुळे मृतदेहावर चांगले संस्कार होत नाहीत. आधीच माणूस मेलेला, त्यात त्याच्या पुढच्या प्रवासातही अडथळे आणण्याचाच हा प्रकार. त्यावर उमाजींसारखी साध्वी संतापणे स्वाभाविकच. नवी दिल्लीत टेरी या संस्थेने आयोजित केलेल्या नदी स्वच्छताविषयक परिसंवादात त्यांच्या या सात्त्विक संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी स्पष्ट सांगितले, की साधुसंतांनी विद्युतदाहिन्यांना मान्यता दिलेली नाही. तेव्हा ज्या ज्या नदीकिनारी विद्युतदाहिन्या आहेत तेथे त्यांचा वापर थांबवावा आणि पर्यावरणस्नेही पद्धतीने म्हणजे कमीत कमी लाकडाचा वापर करून मृतदेहांना अग्नी द्यावा. यामुळे पर्यावरणतज्ज्ञ वगरे मंडळींची बोटे तोंडातच गेली म्हणतात. परंतु हे लोक केवळ पर्यावरणाचा विचार करतात. उमाजींनी गंगा स्वच्छतेबरोबरच मनुष्यमात्रांच्या आत्म्याच्या उन्नतीचाही विचार केला आहे हे कोणी लक्षातच घेत नाही. उलट यातील काही मंडळी हिंदूंच्या अन्त्यसंस्काराच्या एकूण पद्धतीवरच प्रश्नचिन्हे उभी करीत आहेत आणि तिकडे पाश्चात्त्य देशांत तर मंडळी रासायनिक दहनाचा विचार करू लागली आहेत. अशा वेळी आपल्या परंपरा या समजून घेतल्याच पाहिजेत.
प्रत्येक धर्माचे आपापले असे अन्त्यविधी आहेत. मनुष्याचा जीव गेल्यानंतर त्याचे पुढे काय होते हा सगळ्याच धर्माच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय राहिलेला आहे. हिंदूंमध्ये ‘लोकायत दर्शन भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम् कुत:,’ असा सवाल करते आणि वर नास्तिमृत्यूर्गोचर: असेही सांगते. एकदा देहाची राख झाल्यानंतर त्याचे पुढे काहीच होणार नसेल, तर मग बाकीची कर्मकांडे करण्याचा उपयोगच काय, असा या बार्हस्पत्यांचा मुद्दा. पण बाकीच्या धर्मशास्त्रांचे म्हणणे वेगळे आहे. त्यात कर्मकांडे आहेत. त्याचीही परंपरा आहे. त्यात मृतदेहाला तिरडीवरून उघडय़ाने मिरवत नेणे आहे. काही समाजांमध्ये तर ही अंतिम यात्रा मृतदेह खुर्चीवर बसवून काढली जाते. कोणी या यात्रेत टाहो फोडत आपल्या शोकभावनेचे प्रदर्शन घडवितात, तर कोणी अखेरचा दिस गोड व्हावा म्हणून आकंठ सुरापान करून वाद्यांच्या तालावर नाचत निरोप देतात. आपली स्मशाने म्हणजे तर कोणत्याही माणसास हटकून वैराग्यच यावे अशी ठिकाणे. त्यांची नावे तेवढी छान असतात. हल्ली गावोगावच्या या अमरधामांमध्ये आणि वैकुठभूमींमध्ये ग्रामपंचायतीच्या खर्चाने पत्र्याच्या उंच शेड उभारलेल्या असतात. तेवढाच काय तो शोकाकुल जनसमुदायास ऊन-वारा-पावसापासून आडोसा. बाकी मग साराच उघडाबोडका खडक. त्यावरच बाभळीच्या लाकडांची चिता रचायची आणि पाíथवाला भडाग्नी द्यायचा. चार लोकांनी कवटी फुटण्याची वाट पाहत बसायचे. बाकीच्यांनी परतीच्या यात्रेला लागायचे. गंगामयाच्या तीरावर तर ही वाट पाहणेही नसते. तेथे मृतदेह अर्धवट जळतो न जळतो तोच गंगामातेच्या कुशीत टाकला जातो. की जा बाबा, तुझे कल्याण असो! ज्यांना प्रदूषणाची, जंगलतोडीची, नदी अस्वच्छतेची चिंता आहे त्यांनी ती करावी. साधूंची मान्यता असलेल्या या परंपरेत त्याला स्थान नाही.
पण ही खरोखरच प्राचीन परंपरा आहे का? सनातन आर्यधर्मात नेहमीच दहन केले जात असे का? सिंधू संस्कृतीत मृतदेहांचे दफन केले जात असे. महाराष्ट्रातील जोर्वे संस्कृतीचा काळ इसवी सनपूर्व १५०० ते ९००. या संस्कृतीत मृतांचे दफनच केले जाई. लहान मुलांचे शव दोन कुंभांत ठेवीत आणि खड्डा खणून तो उभा गाडीत. प्रौढांचे शव तसेच गाडीत. गाडण्यापूर्वी त्याचे पाय तोडून टाकत, म्हणजे त्याला परत जन्म मिळू नये. आजही अनेक जमातींत दफनाची प्रथा आहे. म्हणजे दहन हीच आपली परंपरा असे नव्हे. तेव्हा मग मृतदेहाचे दहन अमुक पद्धतीनेच केले पाहिजे या आग्रहालाही अर्थ राहत नाही. याबाबतीत इंग्लंडमधील चर्चची अनाग्रही भूमिका लक्षणीय आहे. आज इंग्लंडमध्ये जागेच्या टंचाईमुळे दफन प्रचंड महागडे झाले आहे. तेव्हा लोकांनी परंपरा सोडून दहन करावे. ते निम्म्या खर्चात केले जाईल, असे चर्चने जाहीर केले आहे. अनेक देशांत विद्युत दाहिन्यांचा वापर केला जातो. त्या आता सीएनजीवरही चालविल्या जातात. अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये तर मृतदेहाची राख करण्याऐवजी पाणी करण्याची ‘केमिकल हायड्रॉलिसिस’ प्रक्रियाही वापरली जाते. बेल्जियम, नेदरलँडसारखे देशही ती कायदेशीर करण्याच्या विचारात आहेत. देशोदेशी अन्त्यसंस्काराच्या पद्धती बदलत आहेत. त्यात मेलेल्यांच्या पुढील प्रवासापेक्षा मागे राहिलेल्यांच्या जगण्याची काळजी आहे. पर्यावरणाची चिंता आहे.
परंतु उमा भारती यांना त्याचे काय? त्यांच्या दृष्टीने जाळावे ते कसे हाच खरा ज्वलंत प्रश्न आहे. कारण सवाल भावनांचा आहे, परंपरांचा आहे, धर्म आणि संस्कृतीचा आहे. आणि असा सवाल येतो तेव्हा त्याला उत्तर नसतेच. त्यापुढे लोकांनी फक्त झुकायचे असते. उमा भारतींसारख्यांची वाचाळता खपते ती त्यामुळेच.
संग्रहित लेख, दिनांक 11th Oct 2014 रोजी प्रकाशित
एक ज्वलंत प्रश्न!
कुठे सीएनजी आधारित विद्युतदाहिन्या, कुठे ‘केमिकल हायड्रॉलिसिस’ प्रक्रिया.. देशोदेशी अन्त्यसंस्काराच्या पद्धती बदलत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-10-2014 at 04:37 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uma bharti wants to shut electric cremation