विश्वविजेतेपदावर पाच वेळा आपली व पर्यायाने भारताची मोहोर उमटवणाऱ्या विश्वनाथन आनंद याच्याकडून प्रेरणा घेत गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये अनेक युवा खेळाडू परदेशात आपला नावलौकिक निर्माण करू लागले. आकांक्षा हगवणे ही अशाच खेळाडूंमधील एक. तिने रशियात नुकत्याच झालेल्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून भारताचा लौकिक उंचावला. तिचे वडील श्रीनाथ हे मुष्टियुद्ध खेळातील नामांकित संघटक. आकांक्षा हिच्याकडे लहानपणापासूनच बुद्धिबळाचे नैपुण्य आहे हे पाहून आकांक्षाच्या पालकांनी तिला सतत प्रोत्साहन दिले. आकांक्षाने लहानपणापासूनच अनेक राज्ये व राष्ट्रीय स्तरावर विजेतेपदांचा खजिनाच निर्माण केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या देशात खेळातील करिअर व शैक्षणिक अभ्यासक्रम या दोन्ही आघाडय़ा सांभाळणे ही काही सोपी गोष्ट नाही. कोणत्या तरी एका गोष्टीचा त्याग करावा लागतो. मात्र आकांक्षा ही मुलखावेगळीच खेळाडू. गत वर्षी तिने दहावी इयत्तेचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला. त्यातही तिने ऐंशीपेक्षा जास्त टक्के गुणांची कमाई केली. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये तिला परीक्षेच्या तयारीसाठी जेमतेम पाऊण महिना वेळ मिळाला होता. मात्र तिने किंवा तिच्या पालकांनी याबाबत कोणतीच तक्रार केली नाही. जो काही अल्प वेळ मिळाला, त्याचा उपयोग करीत तिने अभ्यासातही प्रावीण्य दाखविले.

खेळाडूच्या यशामध्ये त्याच्या गुरुजनांचाही मोठा वाटा असतो. खेळाडू व प्रशिक्षक यांच्यात सुसंवाद असेल, एकमेकांवर विश्वास असेल तर खेळाडू हा जास्त चमक दाखवू शकतो. ती दहा वर्षांपेक्षा जास्त काळ फिडे प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडू जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्यामुळेच तिची बुद्धिबळ कारकीर्द घडली आहे. आकांक्षाच्या पालकांनीही तिच्या प्रशिक्षकांवर प्रथमपासूनच विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आकांक्षाला कधीही मोठे दडपण आलेले नाही. आकांक्षाने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ विभागाच्या प्रत्येक वयोगटात विजेतेपद मिळविले आहे. या खेळात सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी संयम, चिकाटी व एकाग्रता या तीनही गोष्टी महत्त्वपूर्ण मानल्या जातात. आकांक्षा हिने या गोष्टींचा आतापर्यंत सुरेख समन्वय दाखविला आहे. त्यामुळेच की काय तिला अखिल भारतीय स्तरावरील प्रतिष्ठेची मानल्या गेलेल्या महाराष्ट्र बुद्धिबळ लीगमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेत तिला तानिया सचदेव, पद्मिनी राऊत, कोनेरू हंपी यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नैपुण्यवान खेळाडूंबरोबर खेळण्याचा योग आला आहे. आपला प्रतिस्पर्धी बलाढय़ असो किंवा दुय्यम दर्जाचा असो, त्याच्याकडून काही तरी आपल्याला शिकण्याची संधी असते. हे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवीत आकांक्षाने वाटचाल केली आहे. आकांक्षासारखे यश मिळविण्याची क्षमता असलेल्या अनेक खेळाडू आपल्या देशात आहेत. मात्र त्यांना प्रोत्साहनाबरोबरच आर्थिक पाठबळही मिळणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aakanksha hagawane