आजच्या काळात आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या व्यक्तींना न्याय मिळणे तसे कठीणच. कारण वकिलांचे दामदुप्पट शुल्क, त्यानंतर तारखांमागून तारखा हे सगळे न परवडणारे गणित असते. अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशातही न्याय ही जणू श्रीमंतांची मक्तेदारी आहे. फार थोडे वकील गरजू अशिलांना मदत करण्याची मानवतावादी वृत्ती जोपासतात. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे एका मराठी मुलीने हेच काम अतिशय नेटाने पुढे नेऊन वंचित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यात वकिलीच्या पेशातून मदत केली. तिने व्यावसायिक वकिली तर केलीच, पण समाजाचे देणे म्हणून अनेक गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. या मराठी मुलीचे नाव आहे दीपा आंबेकर. अलीकडेच तिची न्यूयॉर्क येथील फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश असा त्यांचा नावलौकिक आहे. दीपा या अमेरिकेत स्थायिक असलेल्या प्रज्ञा आणि सुधीर आंबेकर यांच्या कनिष्ठ कन्या  आहेत. दीपा यांचे लहानपण न्यू जर्सीत गेले. अन आर्बर येथील मिशिगन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर रूटगर्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ या संस्थेतून ज्युरिस डॉक्टर (जेडी) ही विधि शाखेतली पदवी घेतली. नंतर लीगल एड्स सोसायटीत त्यांनी वकील म्हणून काम केले. ओमेलवनी अ‍ॅण्ड मायर्स, असेंशुअर, अमेरिकॉर्पस, व्हिसा व्हॉल्युंटर्स या कंपन्यांसाठी त्यांनी वकिली केली. त्यांनी लीगल एड्स सोसायटीच्या माध्यमातून दोन हजार गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यात मदत केली. गरीब लोकांचे खटले त्यांनी विनाशुल्क लढवले. आठ वर्षे सरकारी वकील म्हणूनही काम केले. कायदेविषयक ज्ञानाची पुरेशी शिदोरी मिळाल्यानंतर त्यांनी न्यायाधीशपदासाठी अर्ज केला. तज्ज्ञांनी घेतलेल्या मुलाखती आणि चाचण्या या सोपस्कारानंतर त्यांची न्यूयॉर्कच्या महापौरांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली आहे. ज्यांच्याकडे वकिलांना देण्यासाठी पैसा नाही अशा लोकांसाठी काम करणाऱ्या दीपा आंबेकर यांना समाजकार्याची आवड होती, त्यातूनच त्यांनी विधि आस्थापनातील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून लीगल एड्स सोसायटीत ७० टक्के कमी वेतन घेऊन काम सुरू केले. यातून त्यांनी गरिबांसाठी न्यायाचे दरवाजे खुले करून दिले. कथाकथनातही त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे.  आता न्यायदानातही त्यांच्या विस्तीर्ण जीवनानुभवाचे प्रतिबिंब पडणार आहे. त्याला मानवतेची किनार जरूर असेल यात शंका नाही.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyakti vedh deepa ambekar