डोंबिवली येथील पूर्व भागातील इंदिरा चौकात सोमवारी रात्री एका प्रवाशाला एका रिक्षा चालकाने लाथाबुक्की आणि बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. वाढीव भाडे देण्यास प्रवाशाने नकार दिल्याने रिक्षा चालकाने हा प्रकार केल्याची माहिती आहे.इंदिरा चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा मारहाणीचा प्रकार कैद झाला आहे. कल्याण, डोंबिवलीत रिक्षा चालकांची मनमानी वाढली आहे. बहुतांशी रिक्षा चालक अल्पवयीन, गणवेश न घालता प्रवासी वाहतूक करत आहेत. रिक्षा वाहनतळावर उभे राहून प्रवासी वाहतूक न करता वर्दळीच्या रस्ते, रेल्वे स्थानकांची प्रवेशव्दारे येथे थांबून हे रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करतात. आरटीओ, वाहतूक विभागाने अशा रिक्षा चालकांची माहिती काढून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>कल्याणमध्ये तीन मिनिटात ३० लाखाच्या मोबाईलची चोरी

कल्याण येथील रहिवासी गणेश तांबे सोमवारी रात्री डोंबिवली पूर्व भागात आले होते. त्यांनी इंदिरा चौकातून टाटा पाॅवर पिसवली येथे जाण्यासाठी रिक्षा चालकाकडे विचारणा केली. रिक्षा चालकाने वाढीव भाडे सांगितले. तांबे यांनी एवढे भाडे होत नाही, असे बोलताच रिक्षा चालकाला त्याचा राग आला. त्याने रिक्षेत ठेवलेली बांबूची काठी काढून गणेश यांना लाथाबुक्की, काठीने बेदम मारहाण केली. इतर रिक्षा चालक संबंधित रिक्षा चालकाला दूर लोटत होते तरी मारहाण करणारा रिक्षा चालक दाद देत नव्हता.

गणेश तांबे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या रिक्षा चालकाच्या रिक्षेत त्याने काठी कशासाठी ठेवली होती याची चौकशी वाहतूक, आरटीओ विभागाने करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. रात्रीच्या वेळेत रेल्वे स्थानक भागात आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसांमधून एकदा फेरी मारावी अशीही प्रवाशांची मागणी आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A passenger was beaten with a stick by a rickshaw driver in dombivli amy