कुळगाव- बदलापूर पालिकेचे दुर्लक्ष; वाहतूक कोंडीचाही फटका
बदलापूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय करण्याऐवजी या नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करण्यातच कुळगाव-बदलापूर नगरपालिका प्रशासन धन्यता मानत आहे. नगरपालिकेने वाहनतळाच्या समायोजित आरक्षणांतर्गत पूर्व व पश्चिम येथे बांधलेले दोन वाहनतळ गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे नागरिकांना पूर्व व पश्चिम भागात मिळेल त्या ठिकाणी दुचाकी लावाव्या लागत आहेत. त्यामुळे रस्त्यावर कोंडी झाल्याने वाहतूक पोलीस या दुचाकींवर कारवाई करत आहेत. पर्यायाने याचा दुहेरी फटका शहरातील सर्वच नागरिकांना बसत आहे.
बदलापूर पूर्व व पश्चिम भागात बांधकाम व्यावसायिकांकडून समायोजित आरक्षणाच्या बदल्यात पालिकेने दोन वाहनतळ बांधून घेतले आहेत. पश्चिमेला महादेव मंगल कार्यालयामागे व पूर्वेला उड्डाणपुलाच्या बाजूला हे वाहनतळ गेले सहा महिने झाले तरीही पालिकेने सुरू केलेले नाहीत. चार महिन्यांपूर्वी याबाबत माहिती घेतली असता, काही तांत्रिक बाबी व निविदा प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असून दोन महिन्यांत सुरू करण्याचे आश्वासन पालिकेच्या नगररचनाकारांनी दिले होते. मात्र, चार महिने होऊन गेले तरी याबाबत कोणतीच हालचाल न झाल्याचे निदर्शनास आले आहे.

दोन्ही बाजूला पार्किंग

या वाहनतळाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर दुचाकी उभ्या करत असून यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच या दुचाकींची संख्या वाढली असून पूर्वेला रेल्वेने त्यांच्या हद्दीत वाहनतळांची निर्मिती केली आहे; परंतु येथे वाहन ठेवणे महाग पडत असल्याची ओरड नागरिक करत आहेत. पश्चिमेला वैशाली थिएटर परिसरात खासगी वाहनतळ असून तेथे दुचाकी ठेवत आहेत. परंतु, हे सारेच वाहनतळ अपुरे पडत असल्याने पालिका बांधून तयार ठेवलेले वाहनतळ अद्याप का सुरू करत नाही? असा संतप्त सवाल दुचाकीस्वार उपस्थित करत आहेत. तसेच पालिकेने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेप्रमाणे दुमजली वाहनतळ का बांधले नाहीत, असाही प्रश्नही काही सुजाण नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तरे मात्र तीच..
बदलापूर पश्चिमेकडील वाहनतळाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून बांधकाम विभाग त्याबाबतची कार्यवाही करत आहे, असे उत्तर पालिकेचे नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांनी दिले. तर, याबाबत माहिती घेऊन तुमच्याशी बोलतो, असे उत्तर पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Civilians face inconvenience despite parking