डोंबिवली- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) निवृत्त कार्यकारी अभियंता शामकांत यल्लापूरकर यांचे आज येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
यल्लापूरकर यांचे अभियांत्रिकी शिक्षण धारवाड येथे झाले होते. नोकरी निमित्त ते डोंबिवलीत स्थायिक होते. एमआयडीसीत ते कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले होते. सचोटीने काम करणारा तांत्रिक क्षेत्रातील उत्तम प्रशासक म्हणून यल्लापूरकर यांची महामंडळात ख्याती होती. पाणी पुरवठा विभागात काम करताना महामंडळाचा महसूल वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
महामंडळाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास धुमाळ यांनी त्यांना सन्मानित केले होते. महामंडळाकडे विशेष नियोजन प्राधिकरणाचे अधिकार आले, तेव्हा विकास नियंत्रण नियमावलीचा मसुदा तयार करण्याचे काम महामंडळाने यल्लापूरकर यांच्याकडे सोपविले होते. महामंडळाच्या डोंबिवली कार्यालयातून ते निवृत्त झाले होते.