केंद्र सरकारच्या सर्वेक्षण अहवालाशी भारतीय खारफुटी मंडळ असहमत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : ठाणे तसेच मुंबई पट्टय़ातील खाडीकिनारच्या खारफुटी क्षेत्रात वाढ झाल्याचा दावा केंद्र सरकारच्या वन सर्वेक्षण अहवालात करण्यात आला आहे. मात्र, भारतीय खारफुटी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्याशी असहमती दर्शवली आहे. खाडीकिनारच्या खारफुटीची कत्तल, भूमाफियांकडून होणारी बांधकामे आणि या बांधकामांना मिळणाऱ्या शासकीय परवानग्या ठाणे, मुंबईतील खारफुटीच्या मुळावर उठत असल्याचे मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंद उंटवले यांनी म्हटले आहे.

कांदळवन संरक्षण विभागाअंतर्गत राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण लागवडीमुळे २०१५-२०१७ या कालावधीत मुंबईतील खारफुटीच्या क्षेत्रात १६ चौरस किलोमीटर तसेच ठाणे जिल्ह्य़ात ३१ चौरस किलोमीटर एवढी वाढ झाल्याचे केंद्र सरकारच्या वन सर्वेक्षण अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. खारफुटीच्या क्षेत्रात झालेली ही वाढ सकारात्मक असल्याचे शासनाच्या कांदळवन कक्षाकडून सांगण्यात    येत आहे. मात्र कांदळवन कक्षाने जाहीर केलेल्या या अहवालातील दाव्याबद्दल भारतीय खारफुटी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साशंकता व्यक्त केली. ‘मुंबई वाढवायची म्हणजे खारफुटींची कत्तल हे समीकरण वर्षांनुवर्षे झालेले आहे. तसेच ठाणे जिल्ह्य़ात अतिशय कमी प्रमाणात उरलेल्या खारफुटीवरही मोठय़ा प्रमाणात बांधकाम सुरू असली तरी त्यावर सागरी नियमन क्षेत्र, राष्ट्रीय हरित लवाद, शासन यांचे नियंत्रण राहिलेले नाही,’ अशी टीका भारतीय खारफुटी मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ.उंटवले यांनी केली.

गेल्या दोन वर्षांत ठाणे खाडीतून खारफुटींची कत्तल करून त्यावर बांधकामे उभी करून ते विकण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात सुरू असून भविष्यात ठाणे खाडी संपुष्टात येईल, अशी भीती डॉ.उंटवले यांनी व्यक्त केली.

प्रदूषणातही खारफुटीचा तग

माहीम खाडीत म्हणजेच मिठी खाडीच्या भोवतीच्या परिसरात खारफुटी होती. सध्या या खाडीची दशा अत्यंत वाईट आहे. या खाडीच्या दोन्ही बाजूच्या भिंती तोडून या ठिकाणी भिंती बांधण्यात आल्या आहेत. धारावीचा संपूर्ण कचरा या खाडीत टाकण्यात येत असल्याने खाडीत मोठय़ा प्रमाणात प्रदूषण आहे. मात्र प्रदूषण पेलण्याची क्षमता निसर्गत: खाडीकडे असल्याने या प्रदूषणातही काही प्रमाणात या ठिकाणी खारफुटी जिवंत आहे, असे भारतीय खारफुटी मंडळाचे निरीक्षण आहे.

शासनाच्या कांदळवन कक्षातर्फे खारफुटी लागवड करण्यात आल्याने राज्यभरात एकीकडे खारफुटींचे क्षेत्र वाढत असताना ठाणे, मुंबईतील खारफुटीचे क्षेत्र झपाटय़ाने कमी होणे ही चिंतेची बाब आहे. ठाणे, वसई येथील खाडीकिनारी होणारी बांधकामे, या बांधकामांना सरसकट देण्यात येणाऱ्या परवानग्या यामुळे या खाडींचे भविष्य धोक्यात आहे.

– डॉ. अरविंद उंटवले, कार्यकारी संचालक, भारतीय खारफुटी मंडळ, गोवा.

कांदळवन कक्षातर्फे खारफुटी लागवड आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. ठाणे, मुंबईतील वेगवेगळ्या भागात ही लागवड सुरू आहे. खारफुटीच्या लागवडीचा सकारात्मक परिणाम राज्यभरात जाणवत असताना ठाणे, मुंबई शहरांचाही त्यात समावेश आहे.

– एन. वासुदेवन , मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र शासन कांदळवन विभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no increase in mangroves as par indian mangrove board