कुत्रा हा माणसाचा सगळ्यात जवळचा आणि इमानदार मित्र. त्यामुळे मालक आणि त्याची मैत्री खूपच घनिष्ट असते. ही मैत्री मरणानंतरही तुटत नाही. मध्य प्रदेशमधल्या एका गावात कुत्रा मेल्यानंतर त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत गावातील सगळीच मंडळी जमली होती. भोपाळपासून ३० किलोमीटर लांब असलेल्या नामदार पूरात २७ वर्षांच्या कुत्र्याची अंतयात्रा काढण्यात आली.
गेल्या २७ वर्षांपासून हा कुत्रा नामदार पूरात राहत होता. गावक-यांनी त्याचे कल्लू असे नामकरण केले होते. पण वृद्धापकाळाने त्याचा मृत्यू झाला. गावात सगळ्यांचा लाडका असलेल्या या कुत्र्यावरील प्रेमापोटी त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावक-यांनी कल्लूचे शव जीपमधून आणले त्यानंतर फुलांनी सजवलेल्या एका गाडीत ठेवून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच बँड वाजवून गावक-यांनी आपल्या लाडक्या कुत्र्याला निरोप दिला. गावातील अनेक मंडळी त्याच्या अंत्ययात्रेत सामील झाली होती. माणसाप्रमाणे कल्लूचा अंत्यविधी करण्यात आला. ‘आमच्यासाठी कल्लू कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे आहे, त्यामुळे कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याच्या शवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती गावक-यांनी दिली’. कल्लूच्या अंत्ययात्रेत नामदार पूरातीलच नाही तर आजूबाजूच्या गावातीलही इतर मंडळी सहभागी झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An entire mp village mourned the death of a dog and held a funeral procession for him