जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा फटका ‘प्लेबॉय’ या जगप्रसिद्ध मासिकालाही बसलाय. प्ले बॉय मासिकाची प्रिंट आवृत्ती बंद करत असल्याची माहिती प्लेबॉय एन्टरप्रायजेसकडून देण्यात आली आहे. ‘या आठवड्यातील Spring 2020 ही प्लेबॉयची अमेरिकेतील या वर्षाची अखेरची आवृत्ती असेल’, अशी माहिती प्लेबॉय एन्टरप्रायजेसचे सीईओ बेन कोहन (Ben Kohn) यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच, यापुढे डिजिटल माध्यमावर जास्त लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मासिक पोहोचवणाऱ्या वितरकांच्या ‘सप्लाय चेन’वर करोना व्हायरसचा परिणाम झालाय. त्यामुळे मासिकाचा खप आणि मागणी कमी झाल्याचं कारण प्लेबॉय एन्टरप्रायजेसकडून देण्यात आलं आहे. मात्र, खप कमी झाल्यामुळे प्रिंट आवृत्ती बंद करण्याचा कंपनीचा आधीपासूनच विचार होता, करोना व्हायरसमुळे त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

सप्टेंबर २०१७ मध्ये अखेरचा श्वास घेतलेल्या ह्यूज हेफनर यांनी १९५३ मध्ये ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात केली. मासिकातील नग्न छायाचित्रे, अतिधीट विषयांवरील चर्चा आणि मुलाखती यामुळे साहित्य विश्वात मोठे वादळ निर्माण झाले. मात्र, त्यानंतर तब्बल दोन दशके हे मासिक साहित्यिक विश्वात कायम चर्चेचा विषय राहिले. साहित्य, समाज आणि पारंपरिक अमेरिकी विचारधारा यांच्यावर बंडखोरीतून आसूड ओढत असतानाही केवळ अनावृत ललनांच्या दिलखूश छायाचित्रांच्या माऱ्यामुळे प्लेबॉय मासिकाचा १९५३ सालापासून जगभर प्रसार झाला. जागतिकीकरणाआधी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या गोष्टींपैकी एक म्हणून या मासिकाची नोंद केली जाते. याशिवाय, ह्यू हेफनर अमेरिकेतील व्यक्तीस्वातंत्र्याच्या चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. अमेरिकेतील टपाल विभागाने ‘प्लेबॉय’ मासिक घरपोच देण्यास नकार दिल्यानंतर ह्यू हेफनर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण, अनावृत शरीर छब्यांसोबत वैचारिक आणि साहित्यिक मेजवानीचा झरा प्लेबॉयने कधी आटू दिला नाही. १९८० नंतर बदलत जाणाऱ्या स्पर्धेचा, इंटरनेटचा आणि नियतकालिक वाचनाच्या घटत्या ओघाचा फटका प्लेबॉयला बसला. आज इंटरनेट आणि समांतररीत्या हॉलिवूडला झाकोळण्याची ताकद निर्माण झालेल्या पोर्न विश्वाने स्त्री नग्नतेची व्याख्या बदलून टाकली आहे. या धर्तीवर आपल्या मासिकाचे एकेकाळी असलेले खपमूल्य झुगारून देऊन ‘प्लेबॉय’ने २०१५ मध्ये आपल्या पानांवरून स्त्री-शरीराची दिगंबरावस्था दाखवणार नसल्याचे या महिन्यात जाहीर केले. या माध्यमातून मासिकाला कौटुंबिक स्वरूप देण्याचा आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus impact playboy to end print version of magazine sas