करोना आजाराने अवघ्या जगालाच वेठीस धरलं आहे. भारतातही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रासह इतर राज्यात नवीन संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना लोकांना जागरूक पुढे येत आहे. देशाची जीवनवाहिनी असलेली भारतीय रेल्वेही करोनाविरोधात लढा देण्यासाठी सरसावली आहे. रेल्वेनं सिनेमाच्या डॉयलॉगचा आधार घेत लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
देशात करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ८४ पर्यंत पोहोचली असून, त्यात दिल्ली व कर्नाटकातील दोन करोनाबळींचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. करोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. दिल्लीतील ६ आणि उत्तर प्रदेशातील ११ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर कर्नाटकात करोनाचे ६ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात १४ जणांना, लडाखमध्ये तिघांना, तर जम्मू-काश्मीरमध्ये दोघांना ही लागण झाल्याचे आढळले आहे. याशिवाय राजस्थान, तेलंगण, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये करोनाच्या प्रत्येकी एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या वतीनं लोकांची जागरूकता करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे यासाठी रेल्वेनं सिनेमातील संवाद आणि गाण्यांचा प्रभावी वापर केला आहे. शोले सिनेमातील गब्बरचा संवाद रेल्वेनं वेगळ्या अर्थानं मांडला आहे.
कुछ कुछ होता है सिनेमातील एका गाण्याच्या माध्यमातून रेल्वेनं करोनाचा प्रसार रोखण्याचं आवाहन केलं आहे.