खासगी टॅक्सी कंपनी ओला आणि उबेरविरोधात स्थानिक रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. या कंपनीविरोधीत असणारा त्यांचा राग या ना त्या कारणाने बाहेर आला आहे. अशात केरळमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिला प्रवाशाने रिक्षाने प्रवास न करता उबेर टॅक्सी मागवली म्हणून संतप्त रिक्षाचालकांनी या महिलेला दमदाटी केली, इतकेच नाही तर त्यांची उबेर चालकाला मारण्याचाही प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात ७० वर्षीय वृद्धाने केले मुंडन

केरळमधल्या एर्नाकुलम रेल्वे स्टेशन परिसरातून घरी जाण्यासाठी विद्या गोपालकृष्णनन या महिलेने उबेर बुक केली होती. ती टॅक्सीत बसून घरी जाण्यासाठी निघाली असता स्टेशन परिसरातील इतर रिक्षाचालकांनी त्यांची टॅक्सी अडवली. तसेच तिला टॅक्सीतून घरी न जाता रिक्षामधून घरी जाण्याची जबरदस्ती रिक्षाचालकांकडून करण्यात आली. एर्नाकुलम टॅक्सी परिसरात येथील स्थानिक रिक्षा चालक संघटनांनी ओला आणि उबेर आणण्यास मनाई केली आहे. तसा फलकच त्यांनी या परिसरात लावला आहे. विद्या यांनी हा नियम मोडला म्हणून त्यांना टॅक्सीतून खाली उतरून रिक्षाने जाण्यास सांगण्यात आले. अनेक रिक्षाचालक त्यांच्यावर तुटून पडले. तसेच काही रिक्षाचलकांनी उबेर टॅक्सी चालकाला धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्नही केल्याचे समजते.

वाचा : बँकेत जाणा-या नागरिकांना रिक्षाप्रवास विनामूल्य

विद्याने हा दमदाटीचा सारा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओही तिने युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. आतापर्यंत एक लाखांहूनही अधिक लोकांनी तो पाहिला आहे. विद्याने स्थानिक रिक्षाचालकांनी केलेल्या अरेरावीची तक्रार पोलिस स्टेशमध्येही केली असल्याचे समजते आहे. तसेच एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार या रिक्षाचालकांनी उबेर टॅक्सी चालकाला मारहाण केल्याचेही तिने सांगितले. विद्याने फेसबुकवरही पोस्ट टाकून रिक्षाचालकांची ही अरेरावी समोर आणली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala auto rickshaw drivers threaten woman for booking uber