Mumbai Viral Video : घरकाम करणाऱ्या महिलांकडून स्वच्छतेची खूप काळजी घेतली जाते. या महिलांकडून त्यांच्या मालकिणी घरातील प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ करून घेतात. यात प्रत्येक सणाला घरातील भांडीकुंडीपासून ते खिडक्या, पुस्तकांवरील बारीकसारीक धूळ साफ करून घेतली जाते. पण, मालकिणींची साफसफाईची हौस मात्र कधीकधी घरकाम करणाऱ्या महिलांना अडचणीत आणणारी ठरते.

असा काहीसा प्रकार मुंबईतील कांजूरमार्गमधील एका इमारतीत पाहायला मिळाला. इमारतीच्या १६ ते १७ व्या मजल्यावर एक महिला खिडकी साफ करताना दिसली. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला कोणत्याही संरक्षणाशिवाय इमारतीच्या खिडकी बाहेर उभी राहून साफसफाई करतेय, हे दृश्य खरंच धडकी भरवणारे आहे; तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक घरकाम करणारी महिला अतिशय धोकादायक पद्धतीने खिडक्या साफ करतेय. उंच इमारतीच्या एका फ्लॅटच्या खिडकीबाहेरील लहानशा बाल्कनीसारख्या जागेत उभी राहून ती खिडक्या पुसतेय. कोणत्याही सुरक्षिततेची खबरदारी न घेता ती खिडकीच्या काठावर उभी असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय.

ही घटना कांजूरमार्ग येथील रुणवाल ब्लिस इमारतीतील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा बहुधा १६ व्या मजल्यावरील किंवा त्यावरील फ्लॅट असावा, जिथे एक महिला पाण्याची बादली घेऊन खिडकी स्वच्छ पुसण्यात व्यस्त आहे. इथून जराही तोल गेला तरी लगेच कोणाचाही मृत्यू होऊ शकतो. पण, कशाचीच फिकर न करता ही घरकाम करणारी महिला आपल्या पोटासाठी हे काम करतेय.

Read More Trending News : मुंबईत तुमच्या रिस्कवर नाश्ता करा; Video तील ‘हे’ किळसवाणे दृश्य पाहून तुम्ही इडली, मेदूवडा खाणं द्याल सोडून

व्हिडीओ ऑनलाइन समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्सचे त्याने लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी या साफसफाईच्या जीवघेण्या कृतीवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही घटना कशी धोकादायक आहे आणि किती सावधगिरीची गरज आहे यावर भाष्य केले, तर काहींनी मालकिणीनेच तिला बाहेरून खिडक्या साफ करण्यास भाग पाडले असेल असे म्हणत हा निव्वळ मूर्खपणा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. करोडोंचा फ्लॅट खरेदी करता, पण ५०० रुपये खर्च करण्याऐवजी घरकाम करणाऱ्या महिलांचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहनही काहींनी केले आहे.

यावर काहींनी तर मीम्सही शेअर केल्या आहेत आणि विचारले आहे की, भावांनो ही स्टंटमॅनची मुलगी आहे का? तिला भीती वगैरे नावाची गोष्ट माहीत आहे की नाही?