आपल्याकडे गोरा रंग म्हणजेच सर्व काही आहे. गोऱ्या रंगाच्या मुलीच सुंदर असतात, ज्या सावळ्या किंवा त्यापेक्षाही गडद वर्णाच्या आहेत त्या सुंदर नसतात असा पूर्वग्रह आहे. हा पूर्वग्रह अद्यापही मोडला नाही. आजही येथे सौंदर्यतेची व्याख्या रंगावरून ठरते. त्यातून भरीस भर म्हणजे फेअरनेस क्रिमचे वाढलेले स्तोम. वर्ण गोरा असेल तर तुम्हाला यश मिळेल असे काही तरी रंगवून रंगवून जाहिरात केली जाते. काही दिवसांपूर्वी याचवरून बॉलिवूडमध्ये ट्विटर वॉर पाहायला मिळाले होते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे. साडी, दगिने अशा पारंपरिक पेहरावात नटलेल्या या मुली आहे. ‘हा आहे भारतीय सौंदर्याचा खरा चेहरा, जो तुम्हाला भारतीय कधीच दाखवणार नाही’ अशी ओळ लिहून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अनकॅनी ट्रुथ टेलर २’ या फेसबुक अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटो शेअर झाल्याबरोबरच तो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला. या एका फोटोतून काळ्या वर्णाच्या मुलींविषयी असलेला द्वेष आणि गोऱ्या वर्णाचा आग्रह अशा भारतीय मानसिकतेवर नेमकेपणानं बोट ठेवलं आहे. कधी कधी काही गोष्टी शब्दांतही इतक्या तीव्रपणे मांडता येत नाही तितक्या प्रभावीपणे त्या फोटोच्या माध्यमातून मांडता येतात. तेव्हा भारतीयांची गोऱ्या आणि काळ्या वर्णाच्या मानसिकतेवर या फोटोने भाष्य करून लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोटो शेअर करून अनेक जण आपापली मते मांडत आहेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही महाविद्यालयीन मुलींनी देखील एक मोहिम सुरू केली होती. अनेकांना काळा रंग आवडतो, मग कांती जर काळ्या वर्णाची असेल तर त्याचा द्वेष का करावा? असा सवाल करत त्यांनी मोहिम राबवली होती. यातल्या अनेक मुलींना त्यांच्या वर्णामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला होता. तेव्हा त्यांच्या या मोहिमेला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद लाभला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo of three black woman goes viral on social media