भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच आपला तिरंगा. या तिरंग्यात तीन रंग प्रामुख्याने आणि ठससशीतपणे दिसतात त्यामुळे या तिरंग्याला तिरंगा म्हटलं जातं. दरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर कायमच अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र विद्यार्थी आणि त्याचे शिक्षक यांच्यातल्या संवादाचा हा व्हिडीओ आपल्या भावनिक करणारा आहे.

काय आहे या व्हिडीओत

या व्हिडीओत शिक्षक मुलांना विचारतात, सांगा मुलांनो आपल्या तिरंग्यात किती रंग असतात? त्यावर मुलं म्हणतात सर तीन रंग असतात. त्यावर एक मुलगा म्हणतो की पाच रंग असतात. सर म्हणतात तू पाच रंग म्हणालास ना? उभा राहा. बेंचवर उभा राहा. तू माझ्या ट्युशनला येत नाहीस म्हणून तुला हे माहीत नाही. त्यावर मुलगा म्हणतो मी पाच रंग पाहिले आहेत. त्यावर सगळे हसू लागतात. सर मुलांना शांत करतात आणि बेंचवर कान पकडून उभ्या असलेल्या मुलाला म्हणतात चल सांग कुठले पाच रंग पाहिलेस? त्यावर मुलगा म्हणतो, पहिला रंग भगवा, दुसरा पांढरा, तिसरा हिरवा आणि अशोक चक्राचा रंग निळा.

सर पुढे विचारतात पाचवा रंग कुठला?

यानंतर सर म्हणतात अरे हे तर चारच रंग आहेत. पाचवा रंग कुठला? त्यावर तो मुलगा म्हणतो पाचवा रंग लाल. सर मी माझ्या वडिलांना शेवटचं पाहिलं तेव्हा त्यांना तिरंग्यात गुंडाळण्यात आलं होतं. तिथे तिरंग्यारवरचा लाल रंगही पाहिला जो माझ्या वडिलांच्या रक्ताचा होता. तिरंग्याचा पाचवा रंग. हे ऐकताच शिक्षकांच्या डोळ्यांतही पाणी येतं. ते अस्वस्थ होतात आणि मुलाला खाली बसायला सांगतात आणि अस्वस्थपणे तिरंग्याकडे पाहतात तेव्हा संदेश येतो “लहू बिखरा पडा है शहीदोंका हर कदम पे, खुद मिट जाते हैं लेकिन आंच नहीं आने देते वतनपे”

@Poojab1177 या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो चांगलाच व्हायरल झाला आहे. ३०० हून अधिक जणांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. भारताच्या सैन्यदलांनी पाकिस्तानवर कशी कारवाई केली हे आपण सगळ्यांनीच पहलगाम हल्ल्यानंतर पाहिलं. आपल्या देशातल्या चार ते पाच जवानांनाही पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांमध्ये वीरमरण आलं. एक सैनिक शहीद होणं ही देशासाठी क्लेशदायक आणि वेदना देणारी बाब असते. हा व्हिडीओही तेच सांगतो आहे. एका लहान मुलाच्या त्याच्या वडिलांबाबतच्या भावना आणि तिरंग्या विषयी वाटणाऱ्या भावना या दोन्ही या व्हिडीओतून व्यक्त झाल्या आहेत.