गीर अभयारण्याच्या परिसरात राहणा-या गावक-यांना जंगलाचे राजे काही नवीन नाही. खरं तर या राजामुळेच तर या जंगलाला ओळख आहे. तेव्हा हे राजे मनाला वाट्टेल तेव्हा गावात येतात आणि जातात. त्यामुळे  एखाद्या सिंहाचे दर्शन होणार हे गावक-यांच्या हळूहळू पचनी पडू लागले आहे. किंबहुना आता लोकांनीच याची सवय करून घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी गीर अभयारण्याच्या जवळ असलेल्या अमरेलीमध्ये भरदिवसा गावक-यांना तीन सिंह दिसले. शेतातून हे सिंह अगदी ऐटीत चालत होते.  गावतल्या एका मुलाने याचा व्हिडिओ काढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडिओ पाहून आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरली आहे. या सिंहांनी कोणालाही नुकसान पोहोचवले नसले तरी इथल्या गुरांची मात्र ते शिकार करत असल्याने गावकरीही तणावात आहे. गेल्यावर्षी अरमेली जिल्ह्यातील एका गावक-यावर तीन सिंहानी हल्ला केला होता. सुदैवाने या हल्ल्यातून तो वाचला असला तरी  गंभीर जखमी झाला होता. गावात सिंहांनी येणे हे प्रकार इथे नवे नाही. जुलै महिन्यात एकाने जुनागढमधला एक व्हिडिओ शेअर केला होता. रात्रीच्या वेळी इथल्या रस्त्यावर एक दोन नव्हते तर ८ सिंह मुक्तपणे संचार करत होते.

तर गीरमधल्याच एका गावात काही महिन्यांपूर्वी सिंहिण देखील आली होती. भर दिवसा तिने गावक-यांसमोरच गुरांची शिकार केली होती. पण गावक-यांची गर्दी पाहून आपली शिकार तिथेच टाकून ती पळून गेली होती. आश्चर्य म्हणजे काही वेळाने ती परतली होती आणि गावक-यांसमोर बसून तिने आपल्या शिकारीचा फडशा पाडला होता. सारे गावकरी आपल्या घराच्या छतावर उभे राहून हा सारा प्रकार पाहत होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three lions were spotted in a village in amreli