आज पाडवा आहे, त्यामुळे आपल्याकडे दिवाळीचा हा चौथा दिवस उत्साहात साजरा केला जात असला तरी परदेशात मात्र आजचा दिवस हा ‘भूतांचा’ दिवस म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला थोडसं आश्चर्य वाटले असेल पण एव्हाना आपण पाश्चिमात्य संस्कृतीशी तसे बरेच परिचित झालो असल्याने आपल्याला ‘हॉलोवीन’ हा शब्द तसा परिचयाचा असेल. त्यामुळे आजचा दिवस परदेशात खास भूतांचा दिवस म्हणजेच ‘हॅलोवीन नाईट’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला युरोप, अमेरिकेतल्या अनेक ख्रिश्चन देशांत ‘हॅलोवीन नाईट’ साजरी केली जाते, म्हणजे आपल्याकडे पितृपक्ष असतो तसेच काहीसे. यादिवशी अनेक मृत आत्मे पृथ्वीवर येतात अशी मान्यता आहे त्यामुळे त्यांच्यासाठी खास केक आणि इतर पदार्थांची मेजवानी केली जाते. पण याव्यतिरिक्तही खूपच अनोख्या पद्धतीने हा सण साजरा करण्याची प्रथा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दिवशी लोक भूतांचे कपडे परिधान करून रस्तोरस्ती फिरतात. काहीजण रात्रीच्यावेळी झाडूवरून उडणारी चेटकीन बनतात, तर कोणी रक्तपिसासू बनून फिरतो. आता या दिवशी आत्मे खाली येतात म्हणजे लहान मुलांनी घाबरून घरात बसायचे असेही नसते. ‘हॉलोवीन नाईट’मध्ये लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी होतात. लहान मुलेदेखील भूतांचे कपडे परिधान करून रात्री’ ट्रिक ऑर ट्रीट’ म्हणत घरोघरी फिरतात. प्रत्येकांच्या घरी जाऊन खाऊ गोळा करतात आणि जर कोणी खाऊ द्यायला नकार दिला की मात्र त्यांची काही खैर नसते. या दिवशी काही जण वेगवेगळ्या शक्कल लढवत शेजारी पाजा-यांना देखील घाबरवतात. पण आजच्या दिवशी सारे काही माफ असते. आजचा दिवस हा फक्त एकमेकांना घाबरवायचा आणि मजा मस्ती करण्याचा दिवस असतो.

तसा या सणाला फारसा जूना इतिहास नसला तरी मजा मस्ती करायला अशा प्रकारे हॅलोवीन नाईट साजरी केली जाते. आजच्या दिवशी खास ‘हॉटेंड हाऊस’ देखील खुले केले जातात. या घरात गेल्यावर कल्पानिक भूतांसोबत काही काळ वेळ घालवण्याचा थरार अनुभवता येतो. या दिवशी खास महत्त्व असते ते ‘जॅको लॅटर्न’ ला. जॅको लॅटर्न म्हणजे कंदील. पण हा कंदील असतो तो खास भोपळ्यापासून बनवलेला. या दिवशी प्रत्येक घरांसमोर भयावह चेहरा कोरलेला भोपळा ठेवला जातो. भोपळ्यात एक मेणबत्ती देखील ठेवली जाते. त्यामुळे रात्री लांबून पाहिले तर भूतच आहे असे भासते. या दिवशी खास अनेक गावांतून मोठ्या प्रमाणात भोपळ्यांची आयात केली जाते. दृष्ट आत्म्यांना हे भोपळे दूर ठेवतात अशी त्यांची श्रद्धा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is halloween night