वसई, विरारमध्ये पालिकेचे एकमेव केंद्र, तेथेही तुटवडय़ामुळे लसीकरणात अडथळे
वसई: शिक्षण वा नोकरीकरिता परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याची मोहीम सर्वत्र राबवली जात असताना वसई, विरार शहरांतील पात्र लाभार्थीच्या मार्गात मात्र अडथळे कायम आहेत. अशा लाभार्थीना लस देण्यासाठी वसई-विरार महापालिकेचे एकच केंद्र सध्या कार्यरत आहे. या केंद्रावर लशीचा तुटवडा असल्याने परदेशी जाण्याचे नियोजन करणाऱ्यांना लस मिळत नाही. ज्या लाभार्थीची एक मात्रा पूर्ण झाली आहे, त्यांना दुसऱ्या मात्रेसाठी या केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत. पालिकेच्या या नियोजनशून्य कारभारामुळे परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांचे शैक्षणिक वर्षच हुकण्याची चिन्हे आहेत.
देशात कोव्हिशिल्ड लशीची दुसरी मात्रा ८४ दिवसांनंतर देण्यात येते. मात्र, विशेष बाब म्हणून परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांना २८ दिवसांच्या अंतराने दुसरी मात्रा दिली जात आहे. परंतु, वसईत सध्या कोव्हिशिल्ड लशीची टंचाई असल्याने पहिली मात्रा घेतलेल्यांना दुसरी मात्रा मिळणेच कठीण बनले आहे. पालिकेतर्फे केवळ वसई पूर्वेकडील अग्रवाल रुग्णालयात परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुळात पालिकेकडे लशीचा साठा कमी येतो. त्यामुळे ५० ते १०० असा साठा उपलब्ध करून दिला जातो. त्यांची लस मिळविण्यासाठी या केंद्रावर गर्दी होत असते. केंद्रावर लस उपलब्ध होताच पहाटे ४ वाजेपासून विद्यार्थी केंद्रावर रांगा लावत असतात.
‘अन्य कुठेही कोव्हिशिल्ड मिळत नाही. त्यामुळे आम्हाला पालिकेच्या केंद्रावर यावे लागते. मी पहाटे चार वाजता येऊन रांगेत उभा राहिलो, तेव्हा कुठे मला लस मिळाली,’ असे अभय द्विवेदी या विद्यार्थ्यांने सांगितले. ‘माझे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. माझ्या विमानाचे तिकीटदेखील काढले आहे. मला पहिली मात्रा घेऊन २८ दिवस झाले आहेत. जर मला लस नाही मिळाली तर माझे शैक्षणिक वर्ष वाया जाईल,’ अशी भीती अक्षय पुजारी या तरुणाने व्यक्त केली. इरफान शेख या तरुणाने परदेशात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. ‘मला लस कुठेच मिळत नाही. कधी लस येते त्याची माहिती मिळत नाही. २ ऑगस्टपूर्वी मला लस नाही मिळाली तर माझी परदेशी शिक्षणासाठीची संधी हुकेल,’ असे इरफान म्हणाला.
‘खासगी केंद्रांवर परवानगी द्या’
सध्या खासगी रुग्णालये आणि खासगी शिबिरांमध्ये सशुल्क लशी दिल्या जात आहेत. परंतु परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्याची परवानगी नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पालिकेच्या केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. खासगी रुग्णालयांना परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.