भाईंदर : महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले असताना विकासकांनी मोकळय़ा जागेवरील कर भरण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे मोकळय़ा जागेवरील कर थकबाकी ८२ कोटी एवढी झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी पालिकेला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.  त्यामुळे पालिकेने अधिकाधिक उत्पन्न वाढवण्याकडे भर दिला आहे. यात विशेष बाब म्हणजे यंदा नागरिकांना २०२१-२२ वर्षांकरिता वितरित करण्यात येणारी कर देयके तीन महिन्यांपूर्वीच देण्यात आली असून त्याद्वारे पालिकेची तिजोरी भरली जात आहे. मात्र दुसरीकडे पालिकेच्या उत्पनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोकळय़ा जागेची कर वसुली संथगतीने झाली आहे. मोकळय़ा जागेवरील कराची थकबाकी ८२ कोटी ३४ लाखांच्या वर गेली असल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष बाब म्हणजे मोकळय़ा जागेची कर वसुली जलद गतीने पूर्ण व्हावी म्हणून २०२०-२१ या गेल्या आर्थिक वर्षांतील मार्च महिन्यात प्रशासनाकडून अभय योजना राबवण्यात आली होती. यात विकासकांना व्याजदरात तब्बल ७५ टक्के सवलत देण्यात आली होती. मात्र तरीदेखील केवळ २२ कोटी रुपयांची कर वसुली करण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाले होते. तरीदेखील विकासक कर भरण्यास दुर्लक्ष करत आहेत.

आतापर्यंत ९ कोटी ४२ लाख रुपयांची करवसुली

मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून २०२१-२२ या आर्थिक वर्षांत  मोकळय़ा जागेच्या कर वसुलीतून ९७ कोटी ४९ लाख रुपये इतके  उद्दिष्ट उत्पन्न ठरवण्यात आले आहे. मात्र यात तब्बल २५ कोटी ४१ लाख रुपयांची थकबकीची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्यामुळे ती गोळा करण्यास पालिकेला मोठय़ा अडचणी भासत आहेत. त्याचप्रमाणे यापैकी ५ कोटी ७३ लाखांच्या थकबाकीत भोगवटा दाखला आणि कर आकारणीचा विषय असल्यामुळे ती मिळण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. तर  आतापर्यंत ९ कोटी ४२ लाखांची कर वसुली पूर्ण झालेली असून लवकरच यात वाढ होणार असल्याची माहिती मोकळय़ा जागेची कर वसुली विभाग प्रमुख नरेंद्र डोंगरे यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Developers avoid arrears vacant space ysh