कल्पेश भोईर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : वीज गळती व वीजचोरीमुळे  महावितरणला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. वीजगळती कमी करण्यासाठी वसई विभाग मंडळाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. मागील वर्षी २१ टक्क्यांवर असलेली वीज गळती यंदाच्या वर्षी १८.६० टक्क्यांवर आल्याने दीड ते दोन टक्क्यांनी वीज गळती कमी झाली आहे. प्रमाण १५ टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू  आहेत.

वसई, विरार शहरासह वाडा परिसरात महावितरणकडून ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो यात घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी असे नऊ लाख ३८ हजार वीज ग्राहक आहेत. परंतु वीजपुरवठा करीत असताना विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींमुळे वीज गळती होत असते. तर दुसरीकडे वीज चोरीचे वाढते प्रमाण यामुळेही महावितरणला मोठय़ा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

वसई, विरार विभागात वर्षांला २३०० ते २४०० मेगा युनिट इतकी विजेची मागणी आहे. परंतु वीज वितरण होत असताना वीजगळतीचे प्रकार होत असतात. सन २०२१- २२ मध्ये लघुदाब वीज गळतीचे प्रमाण हे २१ टक्के इतके होते. तर २०२२- २३ मध्ये वीज गळतीचे प्रमाण हे १८.६० टक्क्यांवर आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वीज गळतीचे प्रमाण दीड ते दोन टक्क्यांनी वीज गळती कमी झाली आहे. आता ही वीज गळती आणखीन कशी कमी होईल यासाठी महावितरणकडून विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. फिडरची क्षमता वाढविणे, रोहित्रांची संख्या वाढविणे, रबर कोटिंग

असलेले बंच कंडक्टर लावणे, स्मार्ट मीटर यासह जे वीज चोरी करीत आहेत व अनधिकृत पणे होणार विजेचा वापर टाळण्यासाठी अ‍ॅक्यु चेक मशीन, झेरा मशीन यंत्राचा वापर करून तपासणी केली जाणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश चव्हाण यांनी सांगितले आहे.

वीज गळतीचे प्रमाण मागील वर्षीपेक्षा आता १५ टक्क्यांपेक्षा ही खाली आणायचे आहे. त्या अनुषंगाने विजेच्या संदर्भात ज्या ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे त्या करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही चव्हाण यांनी सांगितले आहे.

वीज मीटरची विश्लेषणात्मक तपासणी

रिमोट कंट्रोल, मीटर फेरफार करून स्लो करणे अशा विविध शक्कल वापरून वीज चोरी होत असते. होणाऱ्या वीज गळतीमध्ये चोरीच्या प्रकारामुळे ही अधिक फटका बसतो. यासाठी आता अशा वीज चोरावर अंकुश ठेवण्यासाठी मीटरची विश्लेषणात्मक तपासणी केली जाणार आहे.पूर्णत: वीज वापर याची माहिती काढून अभ्यास केला जाईल ज्या ठिकाणी वीज चोरी होत असल्याचा अंदाज येईल अशा ठिकाणी विशेष पथकाकडून धाडी टाकून कारवाई केली जाणार असल्याचे महावितरण विभाग वसई यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 

वीज गळती कमी करण्यासाठी वितरण व्यवस्थेत असलेल्या त्रुटी दूर करणे,  यासोबतच वीज चोरांवरील कारवाई अशा विविध उपाययोजना राबवित आहोत.

– राजेश चव्हाण, अधिक्षक अभियंता महावितरण वसई

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msedcl vasai division takes various steps to reduce power loss zws