वसई-विरारमधील वृक्षगणनेसाठी तांत्रिक सल्लागार नेमणार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : वसई-विरार शहरात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची माहिती मिळावी यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस टॅगिंग) करून वृक्षांची गणना करण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक सल्लागार नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वसई-विरार शहराचे झपाटय़ाने नागरीकरण वाढू लागले आहे. यामुळे काही ठिकाणी वृक्षतोडही केली जाऊ लागली आहे. शहरातील वनीकरणाचा पट्टा वाढावा व पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी पालिकेकडून वृक्षारोपणासारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत; परंतु शहरात असलेल्या वृक्षांची माहिती पालिकेला मिळावी यासाठी राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे वृक्षगणना केली जाणार आहे. या गणनेत वृक्षाची प्रजाती, नाव, फळजाती, उंची, वय, घेर, रंग, सुवास, वृक्षाची शास्त्रीय माहिती, त्याचा उपयोग अशा विविध अंगांनी माहितीची नोंद केली जाणार आहे.

ही सर्व माहिती ‘मोबाइलैबेस्ड सॉफ्टवेअरमध्ये एकत्रित करण्यात येणार आहे. यामुळे कोणी झाडांना इजा पोहोचविणे, वृक्षतोड झाल्यास याची सर्व माहिती पालिकेला समजणार आहे, तर दुसरीकडे वृक्षगणनेमुळे शहरातील हरित पट्टा किती प्रमाणात याची माहिती पालिकेला समजणार असून येत्या काळात आणखीन वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धन करण्यास मदत होणार आहे. तसेच या वृक्षांना ‘जीआयएस टॅगिंग’ करून त्यांना कोड नंबर दिला जाणार आहे. त्यामुळे ‘गूगल’ केल्यास या वृक्षांचे अक्षांश-रेखांश, ठिकाण आणि त्याचे अंतर समजण्यास सोपे जाणार आहे. यासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याची कार्यवाही ही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाकडून देण्यात आली आहे.

एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

वसई-विरार महापालिकेने २०१७ ते २०२० या तीन वर्षांत शिरगाव, नारंगी, खार्डी कोशिंबे, धानिव अशा विविध ठिकाणच्या भागांतील २७९ हेक्टर क्षेत्रात ३ लाख ९ हजार ३७५ इतक्या वृक्षांची लागवड केली होती. त्यातील २ लाख ६८ हजार ४२४ इतके वृक्ष सुस्थितीत आहेत. मागील वर्षी करोनासंकट व जागेअभावी वृक्ष लागवड करता आली नव्हती. मात्र या वर्षी वृक्ष लागवड करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला असून १ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी वन विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही वृक्ष प्राधिकरण विभागाकडून करण्यात आली आहे.

शहरातील वृक्षांची गणना करण्यात येणार आहे. ही गणना जीआयएस टॅिगग पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. 

– डॉ. चारुशीला पंडित, उप-आयुक्त, वृक्ष प्राधिकरण विभाग, वसई-विरार महापालिका

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree census geographic information system ysh