‘क्लीनअप मार्शल’चा ठेका रद्द ; नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे पालिकेचा निर्णय

आता शहरात नऊ ठेकेदारांऐवजी केवळ एकच ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे.  त्याची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

clean-up-vasai
क्लीनअप मार्शल’च्या विरोधातील वाढत्या तक्रारी आणि त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे वसई-विरार महापालिकेने शहरातील सर्व ९ ठेकेदारांचा ठेका रद्द केला आहे. 

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : ‘क्लीनअप मार्शल’च्या विरोधातील वाढत्या तक्रारी आणि त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे वसई-विरार महापालिकेने शहरातील सर्व ९ ठेकेदारांचा ठेका रद्द केला आहे.  आता शहरात एकाच ठेकेदारामार्फत क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली जाणार आहे.

शहर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी वसई विरार महापालिकेने २०१८ मध्ये क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली होती. त्यासाठी शहराच्या ९-प्रभागात ९ स्वतंत्र ठेकेदार नियुक्त करण्यात आले होते. रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणारे तसेच शहर विद्रूप करणाऱ्यांविरोधात ३० वेगवेगळय़ा प्रकारच्या दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या क्लीनअप मार्शलना देण्यात आले होते. करारानुसार दंडातील २० टक्के रक्कम ठेकेदाराला तर उर्वरित ८० टक्के रक्कम ही महापालिकेला देण्यात येत होती.

या क्लीनअप मार्शलचा ठेका पहिल्या दिवसापासून वादग्रस्त ठरला होता. क्लीनअप मार्शलकडून सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करण्यात येत होती. सर्वसामान्य नागरिकांना गाफील ठेवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत होता. नागरिकांवर दादागिरी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे अशा तक्रारी वारंवार केल्या जात होत्या. करोनाकाळात मुखपट्टी न लावणाऱ्यांविरोधात केलेली दंडात्मक कारवाई देखील वादात सापडली होती.

 यामागे मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात येत होता.  नऊ प्रभागात नऊ वेगवेगळे ठेकेदार असल्याने पालिकेचेही त्यांच्यावर नियंत्रण नव्हते. यामुळे या क्लीनअप मर्शलचा उपद्रव वाढला होता. या वाढत्या तक्रारी आणि दंड वसूल करण्यात क्लीनअप मार्शलना आलेले अपयश यामुळे अखेर पालिकेने या सर्व नऊ ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शहरात नऊ ठेकेदारांऐवजी केवळ एकच ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे.  त्याची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

याबाबत माहिती देताना पालिकेच्या उपायुक्त डॉ. चारुशीला पंडित यांनी सांगितले की, या ठेकेदारांविरोधात अनेक तक्रारी होत्या.  अनेक प्रकारे दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र त्या कारवाई करण्यासाठी ते अकार्यक्षम ठरले. त्यामुळे या क्लिन अप मार्शलचा मूळ उद्देश साध्य झाला नव्हता.  हे सर्व नऊ ठेकेदार आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलैपासून देशभरात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. नवीन ठेकेदारामुळे ती मोहीम राबवताना उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांवरच कारवाई

क्लीनअप मार्शलना ३० विविध प्रकारांत दंड वसूल करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यामध्ये हॉटेल, दुकानदार, पान टपऱ्या, विक्रेते, फेरीवाले, रस्त्यावर राडाराडा टाकणारे,  भित्तिपत्रके चिटकवणारे, कारखानदार, हॉटेल व्यावसायिक अशा अनेकांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार होते. मात्र त्यांच्यावर कारवाई न करता केवळ रस्त्यावर थुंकणारे, कचरा टाकणारे यांच्यावरच कारवाई करण्यात येत होती. कुठलेही फेरीवाले, दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यात येत नव्हती.

नवीन क्लीनअप मार्शल ठेका नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातल्या ९ प्रभागांपैकी ६ प्रभागांचा ठेका करार यापूर्वी संपुष्टात आला होता. त्यामुळे नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात येईल.

अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vasai virar municipal corporation canceled the contracts of cleanup marshall zws

Next Story
पालिकेच्या ‘मिशन ५०० कोटी’चे उद्दिष्ट रखडणार ; ७० कोटींच्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिक आमदाराचा विरोध
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी