सुधीर पटवर्धन यांचा स्टुडिओ ठाणे येथे आहे. त्यांनी दाखविलेल्या स्लाइड्समध्ये स्टुडिओ विषयावरची त्याची पाच-सहा पेंटिंग होती. त्यात स्टुडिओचे वातावरण दर्शविणारी दृश्ये आहेत. स्टुडिओच्या त्यांच्या एका चित्रात आपल्या कामातून थोडा विरंगुळा म्हणून खिडकीपाशी उभा राहिलेला चित्रकार दिसतो. तसेच खिडकीमुळे स्टुडिओच्या आतील वातावरणाबरोबर बाहेरचेही वातावरण एकाच चित्रचौकटीत दिसते. दोन भिन्न वातावरण दाखविताना पटवर्धनांची आविष्काराची पद्धतही भिन्न आहे. चित्र रंगविताना चित्रकार अनेकदा थांबून आपले चित्र न्याहाळतो. निर्मिती प्रक्रियेतील या साध्या पण अपरिहार्य घटकावर पटवर्धनांनी चित्र काढले आहे. बऱ्याच चित्रकारांचा स्टुडिओ घरातील एखाद्या खोलीत सामावलेला असतो. साहजिकच चित्र बघण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी अथवा मॉडेल म्हणूनही कुटुंबीयांचा वावर तिथे असतो. नेहमी घडणाऱ्या अशा किरकोळ प्रसंगाला त्यांनी कल्पक चित्ररूप दिले आहे. या चित्रांद्वारे स्टुडिओ संबंधितल्या अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घटकांची जाणीव होते. तसेच पटवर्धनांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा व चिंतनशील वृत्तीचा प्रत्यय येतो.
पटवर्धनासाठी स्टुडिओ म्हणजे चित्रकाराचे खासगी, वैयक्तिक अवकाश! सामान्य माणसांप्रमाणेच चित्रकारही बाहेर जात असतो. विविध वाहने, रस्ते, हॉटेल्स, इमारती, गर्दी, प्रदूषण इत्यादींशी त्याचाही संबंध येत असतो. कधी चित्रकार मुद्दाम निसर्गाच्या सान्निध्यात जातो. हे सर्व जग स्टुडिओमध्ये चित्रकाराच्या दृष्टिकोनातून चित्रात संक्रमित होत असते. विविध भाव-भावना, घटनांची मनातील विश्लेषणे चित्रात उतरतात ती स्टुडिओमध्येच. निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात स्टुडिओतील अवकाश व बाहेरचे अवकाश यात एक प्रकारचा ताण उत्पन्न झालेला असतो. स्टुडिओत इझल, रंग याप्रमाणे एखादे कपाटही असते. त्या कपाटात कलेसंदर्भात पुस्तके असतात. पुस्तकांमुळे देश-विदेशातील अनेक चित्रकार-शिल्पकारांचे अस्तित्व स्टुडिओत असते. त्या अस्तित्वात त्यांच्या चित्रांचे प्रिंट्स, कलाप्रवास, चरित्र इत्यादींचा समावेश असतो. या प्रकारे चित्रकाराचा स्टुडिओतील वावर हा वर्तमानाबरोबर कलेच्या इतिहासाबरोबरही सुरू असतो. चित्रकाराने जमविलेल्या किंवा खरेदी केलेल्या कलात्मक वस्तू स्टुडिओत असण्याची शक्यता असते. या वस्तूंमुळे काही आठवणी, त्या वस्तूंची स्थानिक वैशिष्टय़े किंवा सांस्कृतिक संदर्भ स्टुडिओत मौजूद असतात. घर व स्टुडिओ एका ठिकाणी असते. त्या वेळी तेथील व्यक्ती, त्यांचे कामकाज यांची सरमिसळ होते. तथापि त्यातूनदेखील काही चित्रप्रतिमा निर्माण होऊ शकतात. एकंदरीत पटवर्धन यांनी चार भिंतीत असणाऱ्या स्टुडिओचे व्यापक स्वरूप उलगडून दाखविले.
बैजू पार्थन यांचा स्टुडिओ मुंबईत गोरेगाव येथे आहे. पेंटिंग इन्स्टॉलेशन अशा आपल्या कलानिर्मितीत विविध तंत्रांचा ते वापर करतात. त्यात रंग, कागद, कॅनव्हास अशा पारंपरिक माध्यमांबरोबर फोटोग्राफी, मुद्रणतंत्र, संगणक अशा अपारंपरिक माध्यमांचा एकत्रित वापर ते कुशलतेने करतात. अपारंपरिक माध्यमाचा उपयोग करताना त्यांनी ती तंत्रे शिकून स्वत: आत्मसात केली आहेत. मानवीजीवन, शास्त्रीय शोध, विश्वरचनाशास्त्र इत्यादीतील अनेक लहान-मोठे विषय त्यांनी अभिव्यक्त केले आहेत.
पार्थन यांच्या स्टुडिओत कॅनव्हास, रंगांबरोबर कॅमेरा, व्यावसायिक दर्जाचे स्टुडिओ लाइट्स, कॉम्प्युटर ही साधनसामग्रीही आहे. कॉम्प्युटर डिजिटल टॅबलेटचा उपयोग ते चित्र काढण्यासाठी करतात. त्यांचा स्टुडिओ ही एक व्हर्चुअल स्पेस आहे. वेगवेगळ्या तांत्रिक बाबींचा अंतर्भाव असलेल्या माध्यमांद्वारे ते कलानिर्मिती करत असल्याने त्यात काहींना काही अडचणी, बिघाड, दुरुस्त्या हे चक्र चालूच असते. स्टुडिओत शिरले की बाहेरच्या जगापासून अलिप्त झाले तरी स्टुडिओतील काहींना काही प्रश्न सोडवायचे असतात. कधी ते प्रश्न तांत्रिक स्वरूपाचे प्रत्यक्षच असतात तर कधी कलानिर्मितीच्या संदर्भात स्वत:ला पडलेले प्रश्न असतात. काहीही असले तरी स्टुडिओमध्ये त्यावर उपाय शोधला जातो. तेथेच त्याचे निराकरणही केले जाते. पार्थन हे आपल्या स्टुडिओमध्ये कुशल तंत्रज्ञ व सर्जक कलावंत अशा दोन्ही भूमिका वठवीत असतात. स्टुडिओत मन कामावर एकाग्र केले जाते. कलाकाराची प्रतिभा तेथे फुलून येत असते. निर्मितीच्या वाटचालीची दिशा येथेच मिळते. सभोवतीचा परिसर किंवा जग याबद्दल काहीना काही निरीक्षण शोध सुरू असतो. त्याबाबत काही प्रतिक्रिया मनात उमटत असतात. त्या प्रतिक्रियांना कलाकृतींद्वारे मूर्त स्वरूप लाभते ते स्टुडिओत. त्यानंतर ती कलाकृती इतर लोकांपुढे सादर केली जाते. पत्नीखेरीज स्टुडिओत कोणाची ये-जा नसते. याला अपवाद म्हणजे त्यांची मांजरं पिल्लू असल्यापासून त्यांची ये-जा असल्याने स्टुडिओ मांजरांच्या अंगवळणी पडला आहे.
चित्रकारांचा स्टुडिओ म्हटले की लोकांच्या मनात वेगवेगळे कुतूहल असते. गीव्ह पटेल तरुणपणी बडोद्याला असताना त्यांच्या स्टुडिओत येणाऱ्या खास मैत्रिणीची आठवण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. पुढे या मैत्रिणीशी ते विवाहबद्ध झाल्याचेही त्यांनी सांगून टाकले. पटेल यांचे वास्तव्यही मुंबईत आहे. त्यांच्या स्टुडिओत पत्नी, मुलगी यांच्याशिवाय फारशी कोणाची वर्दळ नसते. स्टुडिओत पोहोचले की ते प्रथम संगीत लावतात. आपली चित्रे न्याहाळतात. मग संगीत बंद करून पेंटिंग करायला सुरुवात करतात. शिल्प किंवा इतर काही माध्यमात काम करायचे असल्यास संबंधित कारागिराला म्हणजे कुंभार, सुतार अशांना ते बोलावतात. स्टुडिओतील पुस्तकांच्या रूपाने अन्य कलाकार, लेखक यांचे अस्तित्व तेथे असते असे त्यांनाही वाटते.
मुंबईसारख्या औद्योगिक महानगरात चित्रकार आणि ग्राहक, संग्राहक, एजंट आर्ट गॅलरीचे मालक-चालक यांचा थेट संपर्क यावा, तो वाढावा यासाठी या उत्सवाचे आयोजन राजेंद्र पाटील यांनी केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2012 रोजी प्रकाशित
स्टुडिओ : स्टुडिओ एक अवकाशमय वास्तू
चित्रकार-शिल्पकारांच्या वाटचालीत स्टुडिओ या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलीकडेच बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानात आयोजित केलेल्या ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’च्या मंचावर ‘स्टुडिओ’ याच विषयावर एक परिसंवाद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-12-2012 at 05:07 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir patwardhan painters studio at thane