गेल्या महिन्याभरापासून पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेला वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरात दाखल झाला आणि अवघी पंढरी विठ्ठल-रखुमाईच्या नावाने दुमदुमून गेली. आपल्या विठ्ठलाच्या भेटीनं वारकऱ्यांचं मन तृप्त झालं, पायी निघालेल्या वारकऱ्यांचे कष्ट लाडक्या विठुरायाच्या दर्शनानं कुठल्याकुठे पळून गेले. लाखोंच्या संख्येनं भाविक पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणी लीन झाले. या भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या पंढरपूरच्या मंदिरात पहाटे तीनच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली.


















